पान:Bhovara-Iravati Karve.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / ६३

मुलाला मांडीवर घेतलेले मला स्मरत नाही. ते काही चांगला पदार्थ खात असले, समोर बशी भरलेली असली, तरी आपल्या पुढेच टुकत उभ्या राहिलेल्या लहान मुलाच्या हातावर त्यांनी कधी काही ठेवले नाही. माझे थोरले भाऊजी कै.अप्पासाहेब ह्यांचे पण अगदी असेच होते. अर्थात आजोबा कोणाही लहान मुलाला हिडीस-फिडीस करीत नाहीत. रागावले तर कधीच नाहीत. आपण होऊन मूल जवळ घेणार नाहीत; पण एखादे जवळ गेलेच तर त्याच्याजवळ गोड बोलतील. मात्र जवळ घेऊन कुरवाळणार नाहीत. अण्णांच्या अगदी उलट त्यांचे मामेभाऊ अप्पासाहेब परांजपे. जाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन माहेरी आली हे कळले मात्र, लगेच तिला पाहायला आले. ते येतात तो मुलगी दूध पिऊन निजली होती. तिच्याकडे टक लावून बघत बसले व मला म्हणतात, “किती गोड आहे नाही जाईची मुलगी!" जाईची मुलगी आहे आपली दहा जणींसारखी. पण अप्पासाहेबांचे वात्सल्य मात्र अति गोड आहे खरे. मुलांच्या बाबतीत आजोबा व त्यांचे थोरले चिरंजीव ह्यांच्यासारखी सर्वस्वी उदासीन माणसे मी पाहिली नाहीत. आजोबांनाही मुले नको होती, असे सासूबाई अधूनमधून सांगत. त्यांत तथ्य किती व तिखटमीठ किती, त्यांनाच माहीत. एवढे मात्र खरे, की आजोबा कधी कोणावर रागावले नाहीत; म्हणून इतर कुटुंबियांप्रमाणे नातवंडेही एकंदरीने आजोबांवर खूष आहेत.
 आजोबा अतिशय भित्रे आहेत. ज्यांनी लोकमताला न जुमानता पुनर्विवाह केला, लोकापवाद व स्वजनांचा राग सहन केला, त्यांच्याबद्दल असे म्हणणे चमत्कारिक दिसते. पण ते जात्या भित्रे ह्यात शंका नाही तोंडास तोंड देणे, वादविवाद करणे, आपली बाजू मांडणे त्यांना जमत नाही. ते गप्प बसतात. फार तर विचार करून लिहीत, पण बोलत नसत. बायकांच्या युनिव्हर्सिटीच्या किती तरी सभा भांडणाने गाजलेल्या आहेत, पण आजोबा मात्र कधी बोलत नसत. कमलाबाई देशपांडे ह्यांच्यावर सव्वीस हजार रुपयांची अफरातफर केल्याचा एक विचित्र आळ आला होता. तो सर्वथैव खोटा होता, हे दहा वर्षांच्या वह्या पाहून सिद्ध झाले. हा आळ आणणारे कोण आणि त्यांनी तो का आणला हेही उघडकीस आले. ह्या सर्व प्रकाराबद्दल खंत वाटून श्री. धनंजयराव गाडगीळ ह्यांनी युनिव्हर्सिटीच्या सेनेटचा राजीनामा दिला. त्या वेळी वह्या तपासणे, हिशेब