पान:Bhovara-Iravati Karve.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२ / भोवरा

ह्याची त्यांना पर्वा नाही किंवा पुष्कळदा जाणीवच नाही असे वाटते.
 लोकांचे काही घ्यायचे नाही हा कटाक्ष खरा, पण पैशाखेरीज इतर गोष्टींत उपकाराचे ओझे होते ही जाणीव त्यांना नव्हतीसे वाटते. ते कुठे वर्गणी मागावयास गेले म्हणजे लोकांकडे उतरत. लोकांची वहाने वापरीत; पण हे ओझे आपले आहे, असे त्यांना वाटले नाही. मी संस्थेसाठी ह्या गृहस्थाकडे उतरलो आहे- माझ्या स्वतःसाठी नव्हे, ही त्यांची भूमिका असे. ते योग्यच होते. कारण त्यांच्या पगारातून काही देणे त्यांना परवडले नसते; द्यावे असे कधी त्यांच्या मनातही आले नाही व संस्थेच्या पैशातून देणे गैर झाले असते. पण लोकांकडून पैशाव्यतिरिक्त सेवा करून घेण्याचा हक्कच मनाला वाटू लागतो.
 एकदा आजोबा खूप आजारी होते व पुण्यातील एका प्रख्यात सर्जनच्या दवाखान्यात एका महिन्यावर उपचारासाठी राहिले. त्या दवाखान्यात औषध पाणी, खाणेपिणे, नर्सकडून सेवा अगदी उत्कृष्ट झाली. आजोबांना घरी आणल्यावर सर्जनना बिल विचारले. ते काहीही घेईनात, पण आम्हा सर्वांच्या आग्रहावरून फक्त इंजेक्शने, औषधे, वगैरेचे बिल मोठ्या नाखुषीने त्यांनी घेतले. आजोबा चांगले बरे झाल्यावर ही गोष्ट त्यांना सांगितली. ही हकीकत ऐकून ते म्हणाले. “अरे, आता माझ्या बँकबुकात काही शिल्लक नाही. चार सहा महिन्यांत मी तुम्हा मुलांचे पैसे फेडीन” आम्ही सर्वांनी त्यांच्याशी वाद घातला. की “जर त्या सर्जनच्या उपकाराचे ओझे खरोखर मोठे झाले होते; पण ते तुम्हांला वाटले नाही. आणि ज्या मुलांना तुमच्यामुळे आज चांगले दिवस होते, त्यांनी कधी जन्मकर्मात चार कवड्या खर्च केल्या तर परत देण्याची गोष्ट करता, है योग्य आहे का?" आजोबांनी आमचे म्हणणे कबूल केले. पण त्या वर्षी दिवाळीच्या दिवशी मला वीस रुपये देऊ केले व म्हटले, “हे तुझ्यासाठी खण नि मुलांसाठी खाऊला” मी घेत नाहीसे पाहून म्हटले. “अग, परतफेड नाही. माझी दिवाळीची भेट आहे ही” मी काय बोलणार? मुकाट्याने पैस घेतले. त्या दिवाळीला आम्हा पाची सुनांना (आम्ही चौघी व नानासाहेब आठवल्यांची पत्नी सुशीलाबाई) व नातवांना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा व शेवटचे खणासाठी व खाऊसाठी पैसे दिले!
 आजोबांनी कधी एखाद्या मुलाच्या हातात खाऊ ठेवला किंवा एखाद्या