पान:Bhovara-Iravati Karve.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६ / भोवरा
 

भारतामध्ये सगळे कसे शांत व स्थिर असते. तेच रस्ते, तीच नदी, तीच ओळखीची माणसे-फक्त आपल्या नात्यातलीच नव्हेत तर इतरही. पुण्यातला टांगा चालवणारा बाबू सगळ्यांच्या ओळखीचा; वीस वर्षे ओळखीचा, माळीणबाईची ओळख तिच्या मरणाने तुटली, कॉलेजात ज्यांनी शिकवले ते गुरुजन, आजचे सहाध्यापक, तीच शेजारीण माझ्याबरोबरच हळूहळू म्हातारी झालेली, तीच माझी व शेजाऱ्यांची मुले हळूहळू मोठी होता होता बरोबरीची झालेली. शाळेतल्या मैत्रिणी दहा ठिकाणी पांगल्या तरी भेट झाली की तीच ओळख पुढे चालू होते. सगळे संबंध स्थिर, रुजून मुळ्या धरून बसलेले, मागच्या कित्येक जन्मांचे, पुढे कित्येक जन्म चालू राहणारे. इथे मात्र सगळेच काही विलक्षण गतिमान, क्षणाक्षणाला बदलत जाणारे. पावसाळ्यातील वादळी वाऱ्यात बोट मुंबईहून निघाली होती. सारखी डचमळत होती. माझ्याबरोबर केबिनमध्ये एक बिचारी बाई होती. तिला भयंकर बोट लागली होती. तिला मी परत परत विचारी, “काय करू बरं ? कशानं आराम वाटेल तुम्हांला?" ती म्हणायची, “एक पळभर- खरंच अगदी पळभरच- बोट स्थिर थांबवायला सांगा हो" मला कित्येकदा त्या बाईची आठवण व्हायची. अमेरिकेतील वेगवान धावणाच्या आयुष्यात माणसाला, निदान मला तरी, मी स्वतः धावते आहे असं वाटायचं नाही. काहीतरी जोरानं फिरत आहे, आणि आपण त्या काहीतरीत असल्यामुळे अनिच्छया फिरत आहोत असं मला होई.सान्फ्रान्सिस्कोला जाताना मधे प्रचंड मोठ्या पुलावरून जावे लागे. एका बाजूने अविरत, न थांबणाऱ्या समोरून येणाऱ्या मोटरींचे पांढरे दिवे, तर स्वतःच्या बाजूला तितक्याच वेगाने धावणाऱ्या लाल दिव्यांची माळ! एका प्रचंड कारखान्यात दोन समांतर पट्टे विरुद्ध दिशेने फिरत आहेत-एकावर जाणारा माल, एकावर येणारा माल आणि त्यातलाच मी एक मालाचा पुंजका.माझी गती माझी नव्हती. माझे डोके फिरावयास लागायचे.
 “एक पळभर-खरंच, पळभर थांबवा हो हा पट्टा" माझे मन सारखे ओरडायचे.
 युनिव्हर्सिटीत विद्यार्थी व शिक्षक सगळेच बदलत असतात. कोण कधी, केव्हा, कुठे जाईल ह्याचा नेम नाही. पटत नाही म्हणून जातात असेही नव्हे. काहींना पगार जास्ती मिळतो, काहींना शिष्यवृत्ती मिळते,