पान:Bhovara-Iravati Karve.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८ / भोवरा

वाढदिवस मुलांनी साजरा केला त्या दिवशी सासूबाई सांगत होत्या की, “गेल्या ५० वर्षांत कर्व्यांनी कधी मला लुगडं घेतलं नाही!"
 मुलांना बी.ए.पर्यंत शिक्षण द्यावयाचे (डी.ए. सोसायटीचे लाइफमेंबर असल्यामुळे फी कधीच पडली नाही.) पुढचे त्यांचे त्यांनी पहावे, असा आजोबांचा करार. दुसऱ्या मुलाने डॉक्टरीचे शिक्षण घेतले. मुंबईस राहावयाचा व शिकावयाचा जो खर्च झाला तो आफ्रिकेत डॉक्टरी करावयास जाऊन फेडला. तिसरा मुलगा बी. एस्सी.त पहिला येऊन स्कॉलरशिप मिळवून बंगलोरला शिकायला गेला. तेथे एम्. एस्सी. झाल्यावर विलायतेला जायचे मनात आले. पैसे कुठून आणायचे? आजोबा तर कुणाजवळ मागायचे नाहीत. हिंगण्याच्या संस्थेचा सर्व किराणा माल त्या वेळी आढाव नावाच्या मंडईजवळच्या दुकानदाराकडून घेत असत. सासूबाई त्यांच्याकडे गेल्या व तीन हजारांचे कर्ज मागितले. त्या देवमाणसाने पण सासूबाईंच्या शब्दावर कर्ज दिले ! कर्ज मिळाल्यावर सासूबाईंनी आजोबांच्या खनपटीस बसून त्यांना प्रॉमिसरी नोट लिहावयास लावले. विलायतच्या अभ्यासाला आणखीही पैसे लागले. पैकी साडेपाच हजार आजोबांचे कर्ज म्हणून परत केले, व त्या पैशांत शेवटचा मुलगा विलायतेला गेला. तो हिंगण्याला आजन्म सेवक झाला, म्हणून आजोबांनी त्याच्याकडून कर्ज परत घेतले नाही. सासूबाई कधी ह्या सर्व जुन्या गोष्टी काढून डोळ्यात पाणी आणू लागल्या, की आजोबा खूप वेळ एकून घेत. मग म्हणत, “अग, त्याचे सगळे नीट झाले आहे ना? आता का रडतेस?"
 पहिल्या मुलावर सासूबाईंचा फार जीव. तो जोशांसारखा गोरा, बाकीची मुले कर्व्यांसारखी काळी ! तो हुशार, कर्तबगार, श्रीमंत ! पण खरे म्हणजे ह्या सर्वांपेक्षा पुनर्विवाह झाल्यावर झालेले हे पहिले अपत्य, तेव्हा त्यांना साहजिकच त्याच्याबद्दल फार जिव्हाळा! पण तो तर आफ्रिकेत जाऊन बसलेला. “अरे, इथं नसती का तुला डॉक्टरी करता आली?" तर उत्तर येई, “कधी घर असं माहीतच नव्हतं आम्हांला. सदा आपली धर्मशाळा. इथं पुण्यात तसंच होईल, म्हणून मी लांब जात आहे." सासबाईंचा संसार होता खरा तसाच; पण त्याला काय त्या एकट्याच जबाबदार होत्या? पण त्या कळवळ्याने कधी बोलत, कधी रागावत म्हणून त्यांना उत्तरे मिळत. आजोबांनी कधी शब्दाने विचारपूस केली नाही. कोणी