पान:Bhovara-Iravati Karve.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ५१

श्रीमंतीण. पण ती सारखी म्हणत होती, “मी मेले असते तर बरं होतं.” मला काही समजेचना की तिचं दुःख एवढं अनावर का?
 आमचा चंडीप्रसाद इकडेतिकडे भटकत होता तो एवढ्यात आमच्यात आला. मी म्हटले, “एवढी यात्रा केलीन्, पण बघ बाबा, पैशासाठी कसा जीव टाकते आहे ती.” तो माझ्याजवळ सरकला व मला खालच्या सुरात म्हणाला, “बाई, ती काही पैशासाठी नाही एवढी रडत. अहो, त्या काही लुगडी टाकून नव्हत्या स्नानाला गेल्या. ती धाकटी बहीण आहे ना, तिचं स्नान आधीच झालं होतं, सगळे कपडे तिच्याजवळ ठेवून ह्या नदीवर गेल्या. परत येतात तो ही तिथं बसलेली, तिच्या पुढ्यात लुगडी, पातळांच्या घड्या पण जशाच्या तशा, फक्त आंतले पैसे मात्र नाहीसे झाले होते.
 चंडीप्रसादची हकीकत ऐकून मी चमकलेच. दोघी बहिणींना मी गेले आठदहा दिवस पाहात होते, त्यांतल्या एकीशी अधूनमधून बोलतही असे. पण काही विशेष असे जाणवले नव्हते. आज त्या दोघींच्या संबंधावर एकदम नवीन प्रकाश पडला. पण त्या प्रकाशाने काही स्पष्ट न दिसता मनाचा गोंधळ मात्र उडाला. मी परत घोळक्याकडे दृष्टी टाकली. थोरली बहीण किंचित् शांत झाली होती, पण तिच्या मनातला हलकल्लोळ तिच्या प्रत्येक हालचालीत दिसत होता. क्षणभर ती अगदी निश्चल बसे, दुसऱ्याच क्षणी मोठा सुस्कारा टाकून मान हालवी. काही वेळा तिच्या डोळ्यांतून सारख्या धारा वाहात, एरवी ती पुतळ्यासारखी बसे. काही वेळा कपाळावर हात मारी. कधी आश्चर्याने डोळे विस्फारून धाकटीकडे पाही, तर कधी पदर पसरल्यासारखे करून पाहून काही याचना करी. काही तासांपूर्वी ती किती सुखी, तिची यशस्वी कर्तबगार बाई होती. तिने धाकटीवर केवढे उपकार नव्हते का केले? ती श्रीमंतीत गरीब बहिणीला विसरली नव्हती काही. तिचे बोलणे कधी आढ्यतेखोर नव्हते; पण तिच्या बोलण्या-चालण्यात आत्मतुष्टी असे. मला ती समजून येई पण मला त्याची चीड येत नसे- मी थोडीच तिची धाकटी बहीण होते ! आज विचारांनी उभे केलेले सर्व विश्व धुळीला मिळाले होते. किती आत्मप्रतिष्ठा, स्वत:बद्दलचा विश्वास, स्वतःबद्दलची चांगुलपणाची कल्पना, सगळ्या त्या पोरीने पार फाडुन तोडन पायदळी तुडवल्या होत्या. तिचा बिचारीचा आत्मा तडफडत होता. मला तिच्याकडे बघवेना म्हणून मी धाकटीकडे पाहिले. तिचे डोळे कोरडे ठणठणीत होते. पापण्यांनी ते अर्धवट झाकलेले होते. माझी नजर तिला जाणवल्यामुळे