पान:Bhovara-Iravati Karve.pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 भोवरा

 “कालच नाही का मी तुम्हांला हात हालवला? आणि बरेच दिवसांत भेटला नाही असं कसं म्हणता?”
“मला तर काल कुणी भेटल्याचे आठवत नाही. मी कुणाकडं गेले नव्हते, कुणी माझ्याकडे आलं नव्हतं."
 "अहो!” ती बाई हसत म्हणाली, “काल संध्याकाळच्या तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये वाचनालयाच्या मागच्या रस्त्यावरून चालला होतात ना, तेव्हा मी मोटरने त्या रस्त्यावरून गेले– जाता जाता तुम्हांला पाह्यलं व तोंड बाहेर काढून हात हालवला की! तुम्ही पाहात होतात माझ्याकडं."
 “खरंच की!” मी उत्तर दिले. जरा वेळ विचार केल्यावर मला तो प्रसंग आठवला. कुणी हात हालवला, ते काही मी ओळखले नव्हते व मोटर इतक्या वेगाने गेली की ‘असेल दुसऱ्या कुणासाठी’, असेच मला वाटले होते. एकमेकांना न ओळखता, भर्रकन निरनिराळ्या दिशांनी निघून जाण्याला जर ही बाई 'भेट' म्हणत असेल तर म्हणू दे–पण माझ्या अनुभवात तरी त्याला भेट म्हणायला मी तयार नव्हते.
 पुण्याच्या रस्त्यांतून जाताना समोरून कोणी आले-क्षणभर थांबले, दोन शब्द बोलले तर ती भेट होईल का? त्या माणसाचा आवाज ऐकायला मिळेल, डोळ्यांत पाहायला मिळेल, कदाचित शब्दांना अर्थही असू शकेल क्षणभरात का होईना, माझे कान व डोळे कितीतरी गोष्टी टिपून घेतील. भेटीची उत्कटता पळावर वा तासावर मोजण्याचा प्रयत्न करणे वेडेपणाचे नाही का? खरे म्हणजे भारतात असताना असा तासा-मिनिटांचा विचारच माझ्या मनात आला नसता, पण इथे अमेरिकेत मात्र सारखा येतो.