पान:Bhovara-Iravati Karve.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / ४९

अंतर्मनाचा आविष्कार मोठा हृद्य वाटे आणि कधी गोष्टी दिसत असूनही बोध न होता गुंतागुंत वाढे मात्र.
 माझ्या गळ्यात दुर्बीण अडकवलेली असे. मी ती बहुधा पक्ष्यांचे निरीक्षण करावयास उपयोगात आणीत असे. पण मधूनमधून लांब दिसणाच्या हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवरून मी दुर्बिणीतून नजर टाकी. एकदा अशीच उभी असताना शेजारी कोणीतरी आल्याचा भास झाला म्हणून पाहिले, तो धनसिंग, आमचा ओझेवाला, एकाग्रपणे माझ्याकडे पहात होता. “काय रे धनसिंग काय हवं आहे?” “बाई, तुम्ही त्या नळ्यांतून काय बघता?" मी दुर्बिणीचे मळसूत्र कसे फिरवायचे हे त्याला समजावून सांगितले व दुर्बीण त्याला डोळ्यांला लावायला दिली आणि लांब अस्पष्ट दिसणाऱ्या हिमशिखरांकडे त्याचे तोंड वळवले. 'हे काय बुवा यंत्र!' अशा कुतुहलाने जरा भीतभीतच त्याने दुर्बीण डोळ्यांना लावली व तो मळसूत्र फिरवू लागला. मी त्याच्या तोंडाकडे पाहात होते. त्याच्या कपाळावर एखादे अवघड काम करताना उमटतात तशा आठ्या होत्या, ओठ दाबलेले होते; पण लौकरच त्याचे तोंड आश्चर्याने उघडले. आठ्या पार नाहीशा झाल्या. त्याने दुर्बीण काढून लांबच्या डोंगराकडे पाहिले. परत यंत्र डोळ्यांना लावले, परत काढले. नंतर परत डोळ्यांना दुर्बीण लावून चौफेर नजर टाकली. रस्त्यापलीकडे व नदीपलीकडे प्रचंड पहाड होते. तिकडे त्याने मान वळवली व एकदम हात लांब करून मान हलवली व दुर्बीण काढून तो हसू लागला. “बाई, मला वाटलं, तो डोंगर माझ्या हाताला लागेल आणि बर्फ मुठीत घेऊन खाता येईल" परत त्याने दुर्बीण डोळ्यांना लावली व खाली नदीच्या पात्राकडे दृष्टी फिरवली. खाली खोल दोन हजार फुटांवर शेतांत माणसे काम करीत होती. ती त्याला दिसली, तशी त्याने दुर्बीण काढली. एक लांब श्वास घेतला व मला म्हणतो, “हे उंच उंच डोंगर भोवती नसते तर मला दुर्बिणीतून माझं नेपाळातलं घर आणि अंगणातली मुलं दिसली असती; नाही?” धनसिंगच्या मनात केव्हाही डोकावले तरी त्याचे घर, मुले, त्याचे धान्याने भरलेले कोठार आणि त्याच्या गावचे उंच उंच पहाड मला दिसत.
 आमच्याबरोबर कधी थोडे पुढे, कधी मागे चालणारा एक बंगाली बायांचा गट होता. एकाच धर्मशाळेत उतरलो म्हणजे त्यांचे न माझे मोडक्यातोडक्या हिंदीत संभाषण चाले. त्या मेळाव्यात दोघी बहिणी होत्या.