पान:Bhovara-Iravati Karve.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / ३९

 संध्याकाळी नैवेद्याचे ताट घेऊन दर्शनास गेलो. गर्दी फार होती; पण पुरुषांच्या व बायकांच्या निरनिराळ्या बाऱ्या असल्यामुळे दर्शन झाले व प्रसाद घेऊन परत आलो. अंगात बराच ताप असावा; कारण उभे राहणे व चालणे जडच जात होते. वन्संना पंड्याला दक्षिणा द्यावयाची होती; पण त्याने तोंडच दाखवले नाही. दोन दोन निरोप पाठवले तरी पत्ता नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे निघावयाचे होते, म्हणून शेवटी जिथे उतरलो होतो तिथल्या मुलांच्या हातांवर खाऊसाठी पैसे देऊन पुढे गेलो. त्या दिवसाच्या सबंध मुक्कामात कोणाचे काही हिंडणे-फिरणे झाले असेल तर दिनूचे. पाऊस पाच वाजल्यापासून पडत होता. आपल्याकडे हिवाळ्यातही नाही अशी कडक थंडी पडली होती. वन्संचे व त्याचे पंड्याबद्दल बोलणे चालले होते. मला बोलता येत नव्हते व तापामुळे बोलण्याची इच्छाही नव्हती, म्हणून मी ऐकत होते. पंडे बरेचसे अशिक्षित असतात; मंत्रोच्चार धड करीत नाहीत; पैशाचे भयंकर लोभी असतात, हे सर्व खरे. पण यात्रेच्या ठिकाणी यात्रेकरूंच्या राहण्याजेवण्याची सोय होते; थंडीसाठी रजया मिळतात, हे काय कमी आहे? आम्ही देवळात दक्षिणा भरपूर ठेवली होती व पंड्याला पंधरा रुपये द्यावयाचे ठरवले होते; पण आम्ही काही धार्मिक विधी करणार नाही, म्हणून तो इतर यजमानांच्या बडदास्तीत होता. शेवटी ते पंधरा रुपये पुण्यास परतताना आम्ही आमच्या चंडीप्रसादला दिले. पंड्याला माणशी पाच ते दहा रुपये रोजी द्यावयास यात्रेकरू खुशीने तयार असतो; पण पंड्या भांडण काढतो व मग सर्वांचाच विरस होतो. येथे येणारी काही यात्रा श्रीमंतांची असली तरी बहुसंख्य बरेच गरीब असतात व त्यांच्या भोळ्या भावाचा फायदा पंड्यांना मिळतो. हा व्यवहार थोडा कमी लोभ ठेवून झाला, तर दोन्ही पक्षांना संतोषकारक होईल.
 दुसऱ्या दिवसासाठीही घोडे मिळाले नाही म्हणून पायीच निघालो, पहाटे पाचला धर्मशाळेतून निघून नदीच्या पुलावर येऊन पोचलो. परतताना एकदा डोळे भरून सर्व दृश्य बघून घेतले. मंदाकिनीला केदारपाशी फारशी मोठी दरी नाही. येथे मात्र बरेच लांब खोरे आहे. काहीसे कृष्णेच्या जोरखोऱ्यासारखे, मात्र दोन्ही बाजूंचे पर्वत महाबळेश्वरपेक्षा चौपट तरी उंच, व सर्व उंच शिखरांवर बर्फ होते. झाडी मुळीच नाही. बद्रीपलीकडे काही मैल गेल्यावर वसुंधरा नावाचा धबधबा लागतो व त्यापलीकडे