पान:Bhovara-Iravati Karve.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२६ / भोवरा

वन्संही हैराण झाल्या होत्या; म्हणून दूध पिऊन व फराळाचे खाऊन निजायचा बेत केला. गड्यांनी खिचडी करून खाल्ली. शेजारच्या मंडळींचा स्वयंपाक चालला होता; त्यांच्याशी गप्पागोष्टी सुरू झाल्या. ती वऱ्हाडची होती. दोनतीन कुटुंबे सोबतीने आली होती. त्यांच्या पलीकडे आणखी दोघे प्रवासी होते. बायको मलेरियाने आजारी होती. ताप नसेल त्या दिवशी पॅल्युड्रिन घ्यावयाचे व पुढे जायचे; ताप भरला म्हणजे धर्मशाळेत पडून राहावयाचे, असा त्यांचा क्रम चालला होता. बाई मला फारच थकलेली दिसली, केदार करून आमच्याप्रमाणेच मंडळी बद्रीला चालली होती. शेवटी यात्रा पूर्ण केली की नाही कोण जाणे! बहुतेक केली असेल; कारण ‘देह जावो अथवा राहो, यात्रा पार करायचीच,' असा ह्या लोकांचा निर्धार असतो.
 इतर मंडळी बरीच बोलकी होती. यात्रा असली म्हणजे मनुष्य काय काय करतो याबद्दल गोष्टी निघाल्या. वन्सं म्हणत होत्या. “घरी चहा फार तर दोनदा घेत असे; पण इथं शोष पडतो. मुलं म्हणतात, चहा घे- पेला भरभरून पुढे करतात, घेते मग. मुक्कामाला आलं की रोज तेलानं पाय चोळायचे बसल्या बसल्या. घरी का कुणी देहाचे एवढे उपचार करतं !" त्या बायांनी व पुरुषांनीही होकार भरला. “अंगात गरम लोकरीचं, डोकीला गरम पट्टा असं पुरुषांच्या बरोबरीनं कधी कुणी गावात जाईल का? पण इथं तर आता तो प्रकार रोजचाच !” त्या बाया म्हणाल्या.
 एकीने सर्वांचे बूट आवरता आवरता म्हटले, “अहो उभ्या जन्मात कधी बूट घालून जाईन असं स्वप्नातसुद्धा आलं नव्हतं. पण आता आपलं पुरुषासारखं बूट-मोजे घालून रोज चालतो. ते बूट घालायचे कसे हेसुद्धा माहीत नव्हतं. अन् अजून पण रोज घोटाळा होतो!” आम्हांला सर्वांनाच हसू आले. यात्रेत प्रत्येकाच्या पायांत बूट, पण घालण्याच्या तऱ्हा मात्र निरनिराळ्या. उजव्या पायाचा डाव्यात, डाव्याचा उजव्या पायात असे बूट घालणारे आम्हांला आढळले होते. उत्तर हिंदुस्थानचे लोक बूट नीट घालीत; पण दक्षिणेकडच्या व बंगाली बायांना व माणसांना ते जमत नसे. शेवटी त्रासून बूट फेकून द्यावयास निघालेली बाई दिसली. एका यात्रेकरूने अंगठ्याजवळचे कापड फाडून अंगठ्याला मोकळीक करून दिली होती, तर एकाने अंगठा व शेजारचे बोट ह्यांमध्ये एक पट्टी ठेवून पुढचा संबंधच बूट