पान:Bhovara-Iravati Karve.pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भोवरा / २५

जावेसे वाटते. भाषांचा, वंशांचा, पोशाखांचा भिन्नपणा कधीही ह्या एकत्वाच्या जाणिवेच्या आड येत नाही. उलट अनेकांतून एकत्व, विविधतेतून साम्य हा आमच्या संस्कृतीचा गाभा आहे. हल्ली मात्र राजकारणी पुरुषांना अनेकत्वाची व विविधतेची भीती वाटू लागली आहे! सांस्कृतिक आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत केंद्रीकरण करण्याची धडपड चालू आहे. ही धडपड सांस्कृतिक मूल्यांसाठी नसून सत्तेचे केंद्रीकरण करण्यासाठी आहे, असे वाटते.
 मंदाकिनी ओलांडून पोथीवासाला येऊन पोचलो, तेव्हा दिवस चांगला वर होता, दिवसभर जरा निर्जल प्रदेशातून चाललो होतो. त्यामुळे पोथीवासा फार रम्य वाटले. गावाच्या तीनही बाजूंना उंच डोंगर, मधल्या खबदडीत सर्व बाजूंनी खळखळ झरे वाहत होते व त्यांतच गाव बसले होते. खाली असते तर कदाचित उकडले असते; पण आम्ही बऱ्याच उंचावर सात-आठ हजार फुटांवर तरी आलो होतो; म्हणून गारवा चांगला होता. गावात शिरल्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी आधी जागा शोधली. एक लांबच लांब घर मिळाले. आधी आलेली मंडळी मराठीच होती व एका कोपऱ्यात आम्हापुरती जागा होती. तिथे मालकी शाबीत करण्यापुरते गाठोडे टाकले. समोरच्या घरवाल्याच्या दुकानात चहा-कॉफी प्याल्यावर शीण गेला. तेथून घोडी घेऊन तुंगनाथला जायचा बेत केला होता.
 गावाला वेढा देऊन जे डोंगर उभे होते तेच आम्हांला उद्या चढायचे होते. म्हणजे पाणलोट ओलांडून आम्ही अलकनंदेच्या खोऱ्यात पोचणार. अजून तरी इथले ओढे-नाले मंदाकिनीला मिळणारे होते. आम्ही केदारनाथच्या राज्यातच होतो.
 वरून रिकामी घोडी खाली येत होती; पण कोणी घोडेवाला दुसऱ्या दिवसाचा वायदा करावयास तयार होईना. पोथीवासाहून तुंगनाथ सारा साडेचार मैल होता व तेवढ्याचे पैसेही फार मिळायचे नाहीत. सर्वांची आशा ग्वालियाबगड किंवा उखीमठ येथून स्वाऱ्या मिळाल्या तर पाहाव्यात. रात्र पडू लागली. वन्सं व हमालही येऊन पोचले; आणि बाहेर थंडी पड़ लागली म्हणून शेवटी घरात गेलो. चंडीप्रसाद बड्या माताजींसाठी चहा आणायला गेला. तो म्हणाला, “मी बघतो घोडी, तुम्ही स्वस्थ असा” आज चाल मोठी व चढाची झाली म्हणून गडी पण दमले होते. ऊन लागूनलागून