पान:Bhovara-Iravati Karve.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२४ / भोवरा

खोऱ्यात जावयाचे असते. वाटेत तुंगनाथाचे शिखर ह्या यात्रेत सर्वांत उंच असे आहे. तेथे जायचे आम्ही ठरवले. तिकडे जाताना काही पंजाबी मंडळी भेटली. ह्यांच्यातली एक बाई फार गोड बोलणारी होती. ती सर्व बद्रीला पोचेपर्यंत आमच्या थोडी पुढेमागे असत व रोज भेटत. ती बाई म्हणत होती, “कोई यात्रा धनसे करते हैं,कोई मनसे,और कोई तनसे.” “म्हणजे काय?" महामंडलेश्वर यतींचा लवाजमा त्याच वेळी केदारच्या वाटेवर चालला होता व आम्ही कडेला उभे राहून त्या मेण्यात बसलेले श्रीमान धनी व शिष्यमंडळी पाहात होतो. त्यांच्याकडे बोट दाखवून ती म्हणाली. “ही पाहा धनाच्या जोरावरची यात्रा. तुम्ही व आम्ही शरीरबळ व थोडे द्रव्य ह्या बळावर करतो आहोत आणि ज्या बिचाऱ्यांना धनही नाही आणि तनही नाही ते घरीच बसून मनाने यात्रा करीत असतात” ती रोज गमती-गमती सांगायची, गाणी पण खूप म्हणायची. मला आता एकच आठवते. त्याची सुरुवात होते- “गंगा महाराणी मय्या' महाराणी आणि आई ही संबोधने एकाच गंगेला दिलेली ऐकून मला गंमत वाटली.
  दुसरी एक बाई कर्कश गळ्याने आमच्या चट्टीत भजंन करीत होती "मन मोथनु भवु तारो” सर्वच आकारान्त शब्द उकारान्त करण्याची लकब पाहून मला नवल वाटले. ती पूरबियांपैकी होती. पूर्वेकडील हिंदी जिल्ह्यांत अशी बोली आहे की काय कोण जाणे. एक दिवस आमच्या ह्या वाटेवर केदाराकडे जाणारी एक बाई दिसली. तोंडाने ती ‘जय सीयाराम' जय सीयाराम' असे म्हणत चालली होती; तुलसीदास रामायणात सीता शब्द सीया ह्या रूपात मी वाचला होता; पण बोलभाषेतही तो असेल, अशी जाणीव त्या वेळी मला झाली नव्हती.
 हिंदूंची दैवते निरनिराळी, भाषा निरनिराळ्या; पण यात्रेच्या ठिकाणी एकाच भावनेने सर्व गोळा होतात. सबंध भारतावर इंग्रजांआधी कधीही एकछत्री राज्य नव्हते; पण भारताच्या एकपणाची जाणीव व भारताच्या सीमा हजारो वर्षे ठरवल्या गेल्या होत्या. हा एकपणा व या सीमा एकराज्याच्या निदर्शक नसून एका संस्कृतीच्या- हिंदू संस्कृतीच्या-निदर्शक आहेत. त्या सीमांवर सर्व हिंदूंना पूज्य अशी देवस्थाने आहेत; आणि त्यांचे संबंधही मनात इतके रुजले आहेत, की, हिमालयावर गेले की कन्याकुमारीची वा रामेश्वराची आठवण येते. जगन्नाथला गेले की द्वारकेला