पान:Bhovara-Iravati Karve.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७४ / भोवरा

सरळ दृष्टीच्या टप्प्यात येई. आकाशातल्या मोठ्या घड्याळाचे काटे हालत होते. सबंध रानात झाडे हालत होती. आमची टूक पण निर्मनुष्य रस्त्यातून वेगाने चालली होती. पण ह्या सर्व हालचालीत गडबड नव्हती-सर्व प्रकारची अगाध शांतता भरून राहिली होती.

० ० ०


 मी जागी झाले ती एका बंगल्यात, माझी मदतनीस मुले अजून गाढ निजली होती. त्यांना हलवून हलवून जागे केले. तोंड धुऊन चहा घेतो तो जंगलातील अधिकारी दोन रखवालदारांना (फॉरेस्ट गार्ड) घेऊन आला. “ही माणसे तुम्हांला वाट दाखवतील" तो जरा थांबला व किंचित चाचरत म्हणाला “आज इथे ट्रक नाही, पण तुम्हांला ट्रॅक्टर चालत असला तर त्याच्यामागे एक दोन चाकांवरची गाडी लावून तुम्हांला काही मैल जंगलात जाता येईल. पुढे काही मैल चालावे लागेल."
 मी म्हटले, “उत्तम. येऊ द्या तुमचा ट्रॅक्टर.'
 “कुशालपणा, कुशालपणा!" त्याने मोठ्याने हाका मारलेल्या व एक उंच सडसडीत हसतमुख माणूस आम्हांपुढे आला. त्याच्याबरोबर आम्ही दोन-चार दिवस होतो. तो अगदी मूर्तिमंत खुशालपणा होता. त्याच ना खुशा+अप्पा+अण्णा असं मिळून कोडगू भाषेत ‘कुशालपणा' झाले होते. कुशालपणा ट्रॅक्टरच्या मुख्य बैठकीवर बसला. मागे लावलेल्या गाड्या एक बाक ठेवलं होत त्यावर आम्ही बसलो. ट्रॅक्टरला स्प्रिंग नसते त्या रानातील खाचखळग्यांतून जाताना आमची काय अवस्था झाली, हे सांगून कळणार नाही- अनुभव घेतला पाहिजे. मागून कित्येक दिवस आम्हांला ढुंगण टेकून बसता आले नाही.
 ट्रॅक्टर थांबल्यावर चार मैल चालायचे होते. बरोबर कोडगू गार्ड. हे लोक उंचच उंच होते. सर्व पाच फूट आठ इंचांच्या वर. अंगाने अगदी सडसडीत. चालताना काही विशेष चालतात असे दिसत नसे. पण त्यांच्याबरोबर चालताना आम्हांला चांगले पळावे लागे, नंदू गार्डच्या बरोबरीने चाले. चंदू व मी गार्डच्या मागे दहा पावले व आमच्या मागे चांगली पंधरा पावले कमल बिचारा थावत येत होती. त्या रात्री ठरवले की, कामकरी मंडळीचे दोन विभाग करायचे. चंदू व कमल घरी राहणारे व नंदू आणि मी चालणारे. एखाद्या दिवशी मी सुद्धा फार दमून जाई. मग चंदू व कमल जात असे. चालणाऱ्यांनी लांबून रक्त आणायचे,