पान:Bhovara-Iravati Karve.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १७१

वागणुकीने माझे त्याच्याकडे लक्ष वेधले. अत्यंत तलम लांब बाह्यांचा अंगरखा त्याने घातला होता. धोतर तितकेच तलम होते व त्याचा पुढचा लांब ओचा लीलया अंगरख्याच्या खिशात खोचलेला होता. केसांना तेल लावून सुंदर भाग काढला होता. चेहरा तरुणीलाही लाजवील इतका नाजूक व गुळगुळीत होता. हा मनुष्य मंद पावलांनी, वस्त्राची घडी न चुरगळता चालत आला. त्याची दृष्टी लोकांकडे नव्हतीच. मी विचारले तर मला कळले की हा मनुष्य आपल्या स्वतःच्या शाखेत फार विद्वान् म्हणून नाव कमावलेला होता. तो आला. एका टेबलापाशी बसला. काय हवे ते घेऊन खाल्ले. थोडा वेळ बसला. अधून मधून स्वतःशीच मंद मधुर हसत होता; जणू आम्हांला न दिसणारा एक आरसा त्याच्यासमोर होता, व त्यात दिसणाऱ्या स्वतःच्या रमणीय रूपावर तो भुलला होता. नार्सिसस असाच स्वतःच्या रूपावर भुलून, बाहेरच्या मनोहर जगाला विन्मुख होऊन मेला नव्हे का?