पान:Bhovara-Iravati Karve.pdf/165

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा /१६५

पटांगणात मधले दहा फूट सोडून डाव्या बाजूला पन्नासएक लोकांचे उभ्याने गायन व वादन चालले होते; व उजव्या बाजूला तीन हत्ती मधल्या मार्गाकडे तोंड करून उभे होते. मधला हत्ती प्रचंड उंच व रुंद होता. सोंडेच्या टोकापासून शेपटीपर्यंत लखलखणाऱ्या सोन्याचा साज त्याच्यावर चढविला होता. वर सोन्याचे सिंहासन होते व पाच ब्राह्मण मागेपुढे उभे राहून चवऱ्या ढाळणे, पंखा फिरवणे, अबदागीर धरणे वगैरे कृत्यात मग्न होते. दोन बाजूचे हत्ती बरेच लहान लहान होते. आम्ही देवळात सुमारे पाऊण तास होतो. शेकडो लोक सारखे जात येत होते. शेकडो भजन म्हणत होते. गवयाचे, माझ्या कानांना कर्कश वाटणारे गायन चालले होते व हत्ती संथपणे मधून मधून सोंड हलवीत उभे होते, माझी खात्री आहे की त्या शृंगारलेल्या हत्तीला सर्व सोहळा आपल्या प्रीत्यर्थ चालला आहे असे वाटत असणार!
 आमच्या महिन्या-दीडमहिन्याच्या प्रवासात हत्ती पाहिला नाही असा आमचा दिवस गेला नाही; आणि तो भेटायचा किंवा त्याच्याबद्दलच्या गोष्टी ऐकू यायच्या, त्यासुद्धा इतक्या छान असायच्या की आम्ही अगदी हत्तीच्या प्रेमात सापडलो असे म्हणायला हरकत नाही. हत्ती अक्कल आणि चांगुलपण यांचे प्रचंड प्रतीक अशी आमची ठाम समजूत झाली होती. पण इथे पहावे, तो सगळाच प्रकार निराळा. आसामातले हत्ती असे पिसाळल्यासारखे का वागतात, हे काही मला समजेना. परत चौकशीला सुरुवात केली आणि मग मात्र हे कोडे उलगडले. इथे गावाच्या आसपास जे हत्ती भटकत असतात त्याला प्रत्येकाला निदान एकदा तरी बंदुकीची गोळी लागलेली असते. गारो टेकड्यांत पुष्कळ लोकांना बंदुकीचा परवाना आहे. त्यातले बरेच जण हत्तीवर बंदूक उडवून बघतात. एखाद्या बंदुकीची गोळी पायात किंवा पाठीत घुसली तरी हत्ती काही मरत नाही; पण मनुष्य म्हणजे आपल्याला दुःख देणारा एक प्राणी हे काही हत्ती विसरत नाही व एकटीदुकटी वाटेत अडकलेली गाडी किंवा एकटादुकटा मनुष्य सापडला की त्याच्यावर सूड उगवल्याखेरीज तो राहात नाही. पिकाची नासाडी करतो, या सबबीवर लोक हत्तीला मारायला टपलेले असतात. सरकारने संरक्षण दिले नसते, तर हत्तींचा फन्ना उडाला असता. पण हत्ती जिवंत असले तरी त्यांच्याबद्दल प्रेम मात्र कुणाला असत नाही. कोठे म्हैसूर, कूर्ग आणि