पान:Bhovara-Iravati Karve.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६४ / भोवरा

 मी म्हटले, “अहो, मी काही बाहेर निघणार नव्हते- सरकारी अतिथिगृहात..."
 छे, छे, म्हणून काय झालं? एकदा हत्ती बाहेर निघाले म्हणजे काय करतील त्याचा नेम नाही."
 “इतके का या इथले हत्ती द्वाड असतात?" मी विचारले.
 तुम्हांला माहिती नाही का? अहो तुमची मोटर भर दिवसा वाटेत बिघडली नि ती तासाभरात दुरुस्त होऊन तुम्ही निघालात म्हणून बरं. जरा का रात्रीची वेळ असती तर धडगत नव्हती. इथले मोटरवाले मोटर रस्त्यात टाकून खेड्यात जातात, हत्ती आले तर मोटरचा चक्काचूर करतात. जे मोडता येत नाही ते आपटून आपटून चिपटी करतात. माणसाला तर जिवे सोडीत नाहीत.”
 मला वाटले, हा माणूस मला उगीच भेवडावीत असेल. पण मागून चौकशी केली तर त्याच्या सांगण्यात बरेच तथ्य आहे, असे कळले व मला एकदम कोडगूंच्या प्रदेशाची (कूर्गची) आठवण झाली. तेथे हत्ती कधीच धुमाकूळ घालीत नाहीत. रानात बांबू व पानांनी केलेल्या तीनचार फूट उंचीच्या झोपड्यांतून वन्य लोक राहातात. त्याच रानातून माणसाळलेले व जंगली हत्ती फिरत असतात. पण माणूस दगावल्याची वा झोपडी उद्ध्वस्त झाल्याची हकीकत ऐकली नाही. पंधरा-वीस वर्षांनी एखादा द्वाड हत्ती निघतो व त्याला मारावे लागते. पण एरवी कधी कोणी हत्तीला भीत नाही. आम्ही दिवसभर रानातून भटकत होतो; पण कोणी ‘हत्तीला जपा' असे सांगितले नाही. आम्ही तेथे असताना एका माणसाला एका हत्तीने इजा केली. हा हत्ती 'द्वाड' आहे का काय, म्हणून आम्ही काळजीत होतो. पण सगळ्या जंगल ऑफिसरांनी व जंगली लोकांनी निक्षून सांगितले, ‘हा हाती नेहमी फिरत असतो, मुळीच दुष्ट नाही. तो माणूसच द्वाड, दुष्ट असला पाहिजे, चोरून हत्तीची शिकार करीत असला पाहिजे. त्याच्यावर खट करून लेकाला तुरुंग दाखवला पाहिजे.'
 आसामला जाण्याच्या पूर्वीची माझी हत्तीची आठवण तर जन्मात विसरण्यासारखी नव्हती. आम्ही सकाळी उठून गुरुवायूरच्या देवळात होतो. प्रवेशद्वाराच्या आत मोठे भव्य पटांगण होते. समोरच दोनतीन फुटांपलीकडील गाभाऱ्यातील नुकतीच पूजलेली मूर्ती स्पष्ट दिसत होती.