पान:Bhovara-Iravati Karve.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / १५५

पाहण्यास निघालो. त्याही मोठ्या खुशीने आमच्याबरोबर आल्या. कारण ७-८ मैल तंगड्या तोडीत गावाला जायच्या ऐवजी त्यांना जीपमधून प्रवास करायला मिळाला. मुख्य ग्रामसेविका सोनाली सेंगमा म्हणून होती. तिच्या आधी एक आसामी मुलगी मुख्य ग्रामसेविका होती. गारो लोकांनी “आम्ही आसामी नाही, आम्हांला आसामी ग्रामसेविका नको", असे सांगून त्या पोरीचे घर एका रात्रीत जाळून टाकले होते. मोठ्या प्रयासाने थोडीबहुत शिकलेली सोनाली सेंगमा त्यांना सापडली व आता तिची नेमणूक झाली होती. आम्ही खेड्याला पोचेपर्यंत सर्व ग्रामसेविका मजेत गाणी म्हणत होत्या. मीही गारो गाणी ऐकायला मिळतील म्हणून त्यांना गाणी म्हणण्याचा आग्रह करीत होते. गाणी ऐकता ऐकता माझ्या ध्यानात आले की गाण्यांच्या सर्व चाली इंग्रजी. मी त्यांना विचारले, “हे कसे ? तुमच्या आया-आज्या गाणी म्हणत होत्या त्यांतली तुम्हांला काही माहीत नाहीत का?"
 सोनालीने सांगितले, “पूर्वी कधी तशी गाणी असली तर कोण जाणे, सध्या तरी आम्हांला ती बिलकुल माहीत नाहीत. सध्या आम्ही जी ही गाणी म्हणतोय ती सर्व आम्ही मिशनमध्ये शिकलो."
 अर्थातच सर्व गाण्यांच्या चाली इंग्रजी होत्या. लहानपणी मी हुजूरपागेत शिकणाऱ्या ख्रिश्चन मुलीची गाणी ऐकली होती. त्यातले एक मला आठवले.

पाखरा प्रीय तू खाली उतर।
मला गडे आवडतोस तू फार॥
घालीन तुला मी दूधभाकऽऽर।
अन् फिरवीन साऱ्या घरऽऽर भऽऽर!।।"

 अशीच भयंकर हीही सारी गाणी होती की काय कोण जाणे! सोनालीच्या शब्दाने माझ्या विचारांतून मी जागी झाले. ती मला म्हणत होती, “आमच्या या गारो टेकड्यांबद्दलचे गाणे फार सुंदर आहे. ऐकता का?" मी माझी उत्सकता दर्शवली. गाणे सुरू झाले. त्याचे धृपद खालीलप्रमाणे :

 “गॅरो हिल्स, गॅरो हिल्स, गॅ... रो हि... ल्स. जी ए आर आर ओ एच आय एल् एल् अस् गॅ... रो हिल्स."