पान:Bhovara-Iravati Karve.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५२ / भोवरा

कापड विणीत. मी गेले त्याच सुमाराला 'बिहू'(विषुव-संक्रमण) म्हणून मोठा सण यायचा होता. त्या सणानिमित्त आपल्याकडे जसे खण वगैरे देतात त्याप्रमाणे एकमेकांना घरी विणलेले लहान-लहान पंचे देण्याची इथे चाल आहे. त्यामुळे जेथे जावे तेथे पंचे विणायचे काम चालले होते.आसामात बंगाली आडनावे असलेली माणसे खूपच आहेत. बारुआ व बेझ बारुआ या नावांचे लोक खूपच आढळले, बारुआ हे नाव भट किंवा ब्राह्मण या अर्थी असावे असे मला वाटले. बेझ म्हणजे वैद्य असे तेथील लोकांनी सांगितले. बंगालमध्ये ब्राह्मण व कायस्थ यांच्या खालोखाल वैद्य ही जात आहे. ती स्वतःला ब्राह्मण समजते. ते लोक इथे येऊन स्थायिक झालेले दिसतात. बारुआ, ओरिसामधले बारिआ, वन्य प्रदेशातील बढिया व पंढरपूरचे बडवे हे सगळे एकाच शब्दापासून झाले की काय कोण जाणे!
 खोऱ्यात दोन दिवस हिंडून गोहत्तीला परत आले व लगेच दुसऱ्या दिवशी गारो डोंगरांकडे निघाले. गोहत्तीला परतताना खासी डोंगरांच्या पायथ्याने यावे लागते. खासी डोंगरांमध्ये सध्या एक मोठे समाजशास्त्र राहतात. खासी लोक व त्यांची संस्कृती यांना आसाम खोऱ्यांतील लोकांपासून अलिप्त ठेवण्याची हे महाशय कोशीश करून आहेत. ह्या टेकड्यांची ख्याती . रम्यपणाबद्दल फार आहे. पण माझ्या कामाच्या क्षेत्रात त्या येत नव्हत्या; म्हणून त्यांना डावलून मला पुढे जावे लागले.
 संध्याकाळी काही असामी लोकांकडे जेवायला गेले होते.तेथे नाग टेकड्यांचा प्रश्न निघाला. ब्रिटिश राजवटीत सर्व नाग खेड्यांतून एक एक दुभाषी असे. ह्या दुभाषी लोकांना आपल्या स्वतःच्या टोळीची भाषा व आसामी भाषा अशा दोन्ही येत असत. आसामी भाषा बोलता येणे व त्या भाषेतून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करणे म्हणजे एक मोठेपणा समजला जाई. आता मात्र परिस्थिती पार उलटली आहे. नाग टेकड्यांमध्ये आसामी लोकांना- त्यातल्या त्यात बिनलष्करी आसामी लोकांना- प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. सगळा मुलूख लष्कराच्या ताब्यात आहे; व लष्करातले अधिकारी हिंदी बोलतात. पूर्वीचे आसामी दुभाषी जाऊन त्या जागी हिंदी जाणणारे लोक आले आहेत. आसामचे लोक म्हणजे जणू नागांचे शत्रू. त्यांना नाग प्रदेशात येऊ देता कामा नये अशा थाटात सर्व व्यवहार चालतो. या परिस्थितीबद्दल आसामी लोकांना साहजिकच अतिशय