पान:Bhovara-Iravati Karve.pdf/151

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १५१

माहुरगडची रेणुका, गुजरातची बेचराजी, मध्यभारतातील विंध्यवासिनी उत्तरेकडील काली व आसामची कामाख्या अशी तिची अनेक स्थाने व नावे आहेत. इथे गौहत्तीतसुद्धा ब्रह्मपुत्रेच्या पात्रातील प्रणयिनी-उमेच्या देवळापासून सुमारे मैलभर अंतरावर उंच टेकडीवर बसलेले कामाख्या ऊर्फ कामाक्षीचे देऊळ आहे. ही देवी आसामची अधिष्ठात्री देवता असून जादुगारीण म्हणून प्रसिद्ध आहे.
 दुसऱ्या दिवसापासून आसामात प्रवास सुरू झाला. ब्रह्मपुत्रेच्या व कपिली नावाच्या एका उपनदीच्या खोल्यांत दोन दिवस हिंडत होतो. गंगा, यमुना वगैरे नद्या एकदा हिमालय सोडला म्हणजे अगदी सपाट प्रदेशातून वाहतात; पण आसामात मात्र सर्वत्र लहानलहान डोंगर पसरलेले आहेत. त्यांपैकी मुख्य म्हणजे गौहत्तीपासून उत्तरेकडे खासी व जयंति या टेकड्या. येथे खासी नावाच्या लोकांची वस्ती आहे. गौहत्तीच्या नैर्ऋत्येस गारो टेकड्या आहेत, येथे गारो लोकांची वस्ती आहे. गौहत्तीच्या दक्षिणेस लुशाई टेकड्या आहेत, तेथे लुशाई लोकांची वस्ती आहे. याशिवाय निरनिराळ्या लहानलहान टेकड्यांतून निरनिराळ्या वन्य जमातींची वस्ती आहे. आसामच्या पूर्व उत्तर विभागांत प्रसिद्ध नाग टेकड्या आहेत. तेथे सध्या लष्करी अंमल असल्याने साधारण नागरिकाला जायला मज्जाव आहे. मला पाह्यची स्थळे नाग टेकड्यांत नव्हतीच, म्हणून तिकडे जायचा प्रसंगच आला नाही. मी हिंडले त्या प्रदेशात लहान लहान खेडेगावेच बरीचशी होती. एकमजली गवती छपरांची किंवा कौलाची घरे आणि प्रत्येक खेड्यातून एक एक नामघर' असायचे. ‘नामघर' म्हणजे एक मोठीशी एकच खोली असलेली झोपडी. यात माणसे नामसंकीर्तन करण्यास जमतात. बंगालमधून वैष्णवसंप्रदाय आसामात पोचला तेव्हा या ‘नामघरां'ची स्थापना झाली. आसामध्ये ब्रह्यपुत्रेच्या खोऱ्या राहणाऱ्या आसामी लोकांखेरीज' 'आहोम्' म्हणून लोक राहतात. हे लोक मोंगोलवंशीय असून त्यांनी पुष्कळ वर्षे आसामात राज्य केले. बऱ्याच लोकांची अशी कल्पना आहे की, 'आसाम'हे प्रादेशिक नाव “आहोम' या नावावरूनच आले आहे. पुष्कळ आसामी लोक ‘आसाम' या शब्दाचा उच्चार ‘आहाम' असा करतात.
 मी फिरलेल्या खेडेगावांमध्ये मला एक विशेष गोष्ट जाणवली म्हणजे प्रत्येक घरातून माग असत व घरातली लहानथोर सर्व मंडळी मागावर