पान:Bhovara-Iravati Karve.pdf/150

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५० / भोवरा

सबंध वातावरण धुळीने इतके भरलेले होते की नदीचा पलीकडचा काठ काही स्पष्ट दिसत नव्हता. उन्याळ्यातसुद्धा बोटी नदीतून जात होत्या. त्यांच्या शिट्टया ऐकू येत होत्या. त्यांच्या बंबातून निघणारा धूर अगदी स्पष्ट दिसत होता. उन्हाळ्यात जवळजवळ कोरड्या होणा-या पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या पाहिलेल्या मला ब्रह्मपुत्रेचे ते दर्शन मोठे कौतुकाचे वाटले. विश्रामधामाच्या जवळच ब्रह्मपुत्रेमध्ये एक टेकाड होते. त्यावर एक लहानसे देऊळ व त्यात रात्रभर दिवा असे. त्या स्थानाचे नाव ‘उमानन्द'. लग्नानंतर शिव पार्वतीला घेऊन येथे काही काळ राहिला होता म्हणे. त्या टेकडीवर जायची माझी इच्छा, पण दोन-तीन दिवस पहाटेपासून रात्रीपर्यंत इतके काम होते, की ते काही जमले नाही ‘उमानन्दा'ची यात्रा वर्षातून एकदा का दोनदा असते तेव्हा लोक तिथे जातात. एरवी देऊळ पुजाऱ्याखेरीज निर्मनुष्य असते. स्थान रमणीय तर खरेच पण त्या रमणीयतेत एक प्रकारचा भयानकपणा पण वाटतो. गंगा-यमुना वगैरे मोठमोठ्या नद्या, दोन्ही काठांवर मोठी मनुष्यवस्ती, पण तिथे ब्रह्मपुत्रेच्या काठी शहरे किंवा गांवे कमीच. डोंगर आणि झाडीच जास्ती. तेथे राज्य करणारी पार्वती, एक उमानन्दाचे देऊळ सोडले तर, देवीच्या रूपाने निरनिराळ्या देवळांतून दिसते. पार्वतीचे सबंध चरित्रच अनाकलनीय आहे. आईबापांची लाडकी, रानावनातून भटकणारी, हरणांसारख्या चंचल डोळ्याची, भुरभुरत्या केसांची अवखळ उमा, लाकडी गौरी हे एक पार्वतीचे रूप; मनाने वरलेल्या पुरुषाला वश करण्यासाठी प्रणयापासून खडतर तपापर्यंत सर्व उपाय योजणारी आणि शेवटी त्या रागीट, रानटी भोळ्या शंकराला वश करून कह्यात ठेवणारी प्रणयिनी हे दुसरे. शंकराबरोबर बैलावरून आकाशमार्गे जाताना कुणी दुःखी, अपंग असे मनुष्य दिसले तर त्याची चौकशी करून त्याचे दु:ख दूर करणारी, लोकगीतात व लोककथांतून जिची गाणी गायली आहेत, अशी वत्सल आई हे तिचे तिसरे रूप; बापाच्या यज्ञात स्वतःला जाळून घेणारी मानिनी हे चौथे रूप. ती अनन्तरूपा आहे. पण ती देवी किंवा माता म्हणून सर्व भारतभर ज्या रूपाने पजिली जाते त्या रूपाचे मला फार कुतूहल वाटते. सर्वसंपत्तिमान, सर्व शक्तिशाली, सर्वकारुणिक आणि सर्वसंहारक असे ते रूप आहे. तिची देवस्थानेसुद्धा भीती उत्पन्न करणारी आहेत. सौंदत्तीची यल्लमा,