पान:Bhovara-Iravati Karve.pdf/136

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
       १५ 
      सत्याचा शोध

 “आजच्या विज्ञानयुगात शुद्ध स्वरूपात ज्ञानसाधना होत आहे. सत्य काय आहे हे हुडकून काढताना शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसावर घासून बघतात व मगच ती ग्राह्य धरतात. सर्व व्यवहार बुद्धिप्रमाण्यावर आधारलेला आहे ‘बाबावाक्यं प्रमाणम्' ही वृत्ती आता राहिलेली नाही.
 विज्ञानयुगाचे ढोलके बडवण्याच्या दोन तऱ्हा आहेत. एक प्रत्यक्ष स्तुती करून जाता जाता इतर युगांतील लोकांचा कमीपणा दर्शवायचा ही, व दुसरी प्राचीन संस्कृतीचा इतिहास लिहिता लिहिता त्या वेळचे कायदे, नीतिकल्पना, धर्म, ही सर्वच हल्लीच्या मानाने हीन दर्जाची होती म्हणून प्रतिपादन करावयाचे “मिसर (ईजिप्त), बावेरू (बाबिलॉन) वगैरे देश लोक कायम भीतीच्या वातावरणात राहात असत. रोग पसरवणारी निरनिराळी दैवते, माणसाला झपाटणारी भुते, ह्यांनी सर्व सृष्टी भरलेली आहे, असे त्यांना वाटे व मानवी जीवनाचा आनंद त्यामुळे हरपून जाई" असे एक इतिहासकार लिहितो. जणू हल्लीच्या युगात कोणाला कसलीही भीती व रोग नाही! पूर्वीचे जीवन आनंदी होते किंवा नाही, हे त्यांना माहीत? ज्या लोकांत पूर्वीच्या समजुती आहेत त्यांचे जीवन समजुतीमुळे जसे निरानंद दिसत नाही, तसेच पूर्वीच्या लोकांचे असणार. वैदिक काली मलेरिया घालविण्यासाठी मंत्र म्हणत असत व मलेरियाचा राक्षस निघून जाई अशी कल्पना असे. मलेरियाचा राक्षस आहे, का जंतू पसरविणारे डांस आहेत, ह्या ज्ञानावर आयुष्यातील आनंद अवलंबून असण्याचे कारण नाही. ज्ञानामुळे काही अवस्थांत रोगावर नीट उपाययोजना करणे शक्य आहे; पण त्यामुळे जीवनातल्या आनंदात भर