पान:Bhovara-Iravati Karve.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / १३

उखीमठला जायचे व तेथून तुंगनाथला बारा हजार फुटांवर चढावयाचे; परत चमोलीला २००० च्याही खाली उतरायचे- असा सारखा चढउताराचा मार्ग आहे. रस्ता सुरेख आहे-म्हणजे केदारचा. बद्रीचा इतका रम्य नाही. वाटेने सारखे यात्री चाललेले असतात व समोरून येताना प्रत्येक जण ‘जय केदारजीकी’, ‘जय बद्रीविशालजीकी' अशा घोषणेने स्वागत करतो व आपण तेच उच्चारून प्रतिनमस्कार करावयाचा अशी रीत आहे.
 आम्ही वाटेवर भेटणाऱ्या लोकांना ‘तुमचा जिल्हा कोणता?' म्हणून विचारीत असू. हिंदुस्थानच्या सगळ्या प्रांतातलेच नव्हे, तर जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांतले लोक आम्हांला भेटले. महाराष्ट्राचा तर कोंकण, देश, वहाड-नागपूर व मराठवाडा ह्या चार विभागांपैकी अगदी प्रत्येक जिल्ह्यांतला माणूस आम्हांला भेटला. उत्तर प्रदेश, पंजाब, राजपुताना, गुजरात व काठेवाडमधून, त्याचप्रमाणे बिहार व बंगालच्या सर्व जिल्ह्यांतून माणसे आली होती. दक्षिणेकडूनही लोक आले होते. ओरिसाच्या कटक व गंजम विभागातले लोक भेटले. प्रत्येक प्रांतातली भाषा वेगळी, पोषाख वेगळा, गाणी वेगळी, खाणे वेगळे. ही यात्रा म्हणजे भारताचे नित्य नवे दर्शन होते, ओरिसा व दक्षिण हिंदुस्थानच्या लोकांना भाषेमुळे बरीच अडचण पडे. बाकीच्यांना मोडकीतोडकी हिंदी येई व त्यावर निभावून जाई. सिमल्याच्या बाजूचे पहाडी लोक भेटले. त्यांचा बायकापुरुषांचा पोशाख सारखाच. म्हणजे लोकरीची विजार व वरपर्यंत गुंड्या असलेला कोट असा होता, पंजाब्यांची सलवार व खमीस, रजपुतान्यांतल्या बायकांचे घेरदार रंगीबेरंगी घागरे, वर काचोळ्या, डोक्यावर घोंगडी, अधूनमधून तीच पदरासारखी पुढे ओढलेली, असे निरनिराळे पोशाख होते. बंगाली लोक गटागटाने आलेले दिसले. त्यांत मुंडन केलेल्या काही विधवा बायका व काही वेणीदान केलेल्या सधवा बायका खूप होत्या. अगदी तरुण बायकांनी सुद्धा मुंडन केलेले दिसले. शिवाय त्यांतल्या बऱ्याच जणी डोक्यावर पदर वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नसत. त्यामुळे पहिल्यापहिल्याने फार चमत्कारिक वाटायचे; पण एकदा अंगवळणी पडले म्हणजे त्याचे काही वाटत नाही. सोवळ्याओवळ्याचे बंडही त्यांचे मुळीच दिसले नाही. भूक लागली की सगळा तांडाच्या तांडा जिलब्या विकत घेई व रस्त्याच्या कडेला बसून हसतखिदळत, मजेत गप्पागोष्टी करीत खाई.