पान:Bhovara-Iravati Karve.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १२७

 ताईची ही तऱ्हा, तिची ती तऱ्हा. तिने लग्न करावे म्हणून भावाने तिला पुष्कळ सांगितले, पण तिनेच भावावर एकट्यावर भार नको म्हणून लग्न केले नाही. तिला पाहिले की मला वाटते, ती ताईसारखीच एक दिवस जाईल. दोघी चांगल्या मिळवत्या, पण कधी झुळझुळीत वस्त्र नेसल्या नाहीत. दोघींचे केस सुन्दर पण कधी त्यावर फूल घातले नाही. जबाबदाऱ्या अंगाबाहेर टाकायच्या ही युक्ती त्यांना साधली नाही. आयुष्याच्या धकाधकीत इतरांना मागे रेटून आपण पुढे सरायचे ही शक्ती त्यांना नाही. परिस्थिती म्हणजे शक्तियुक्तीनेच आपलीशी करून घ्यायची. अशी शक्तियुक्ती ज्यांच्यात असेल त्यांचेच संसार होतात... त्यांची संतती पृथ्वीची मालक होते. जीवनाच्या झगड्यात यशस्वी होण्यास लागणारा स्वार्थ, बेदरकारपणा दोघांच्यातही नव्हता. डार्विनच्या सिद्धान्ताप्रमाणे त्या जगण्यास नालायक; त्यांनी कामकरी मुंग्यांप्रमाणे इतरांचे संसार उभारायचे, लोकांची कर्जे फेडायची, लोकांसाठी कष्ट करायचे व निर्वंश मरायचे!