पान:Bhovara-Iravati Karve.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२४ / भोवरा

मनात आले. ती जवळ नव्हती, तरी तिचे उत्तर माझ्या कानांनी ऐकले, “अग, त्यांचा अभ्यास होता. मी औषधासाठी जाणारच होते. म्हटलं, मीच आणीन."
 ही काही आजची गोष्ट नव्हती. नेहमी असेच चाले. दवाखान्यातून औषध आणून त्या बाईला देईल; घरी जाऊन भाजी काढून, निवडून चिरील. घाई घाईने अंग धुवील व शाळेला उशीर होईल ह्या भीतीने कसेबसे दोन घास खाऊन बाहेर पडेल. संध्याकाळी घरी आली की परत घरचे काम, नाही तर गावात कुणी नातलग असतील त्यांची कामे. मग शाळेतल्या वह्यांची तपासणी मग सुदैवाने रात्र झाल्यामुळे झोप... हा तिचा रोजचा कार्यक्रम असे.
 आम्ही लहानपणी एका घरात राहिलेल्या, बरोबर शाळेत गेलेल्या. ती माझ्यापरीस मोठी म्हणून नेहमी मला संभाळून घ्यायची. माझीही दोन काम करायची. मला आठवते तेव्हापासून पाहते आहे, प्रत्येकजण आपले हक्काने तिच्याकडून कामे करून घेई. मीही काही त्याला अपवाद नव्हते. आता दोघींच्या दोन वाटा झाल्यावर कधीकधी आमची भेट होते. कधीकधी एकमेकींकडे जातो, एकमेकींचे कसे काय चालले आहे ह्याची आम्हाला बातमी असते; आणि भेटलो म्हणजे दोघींनाही आनंद होतो- म्हणजे मला ती दिसल्याचा आनंद होतो, पण लगेच तिच्या परिस्थितीचे चित्र डोळ्यांपुढे आल्याने दिवसभर हुरहूर व विषाद वाटतो. मी तिच्यासाठी काही करीत नाही; नुसती हळहळते. सुखाच्या आयुष्यात लोकांबद्दल निष्क्रिय सहानुभूती व त्यामुळे वाटणारी हळहळ हीसुद्धा एक प्रकारची चैन आहे.
 ...आज ती मला आणखी वाळल्यासारखी वाटली. लहानपणी ती माझ्या एवढीच दिसायची. आता पहाते तो ती दिवसानुदिवस लहानलहान दिसते. ती लहान होत होती, का मी सारखी फुगत असल्यामुळे ती तशी दिसायची, कोण जाणे! मी जगाची एक घेणेकरी होते. दोघी रिकाम्या हाती व उघड्या अंगाने जगात आलो, पण पहिला श्वास घेतल्यापासून आतापर्यंत माझ्यावर देणग्यांचा वर्षाव होत होता. लाडकी मुलगी, प्रेमाची बहीण, मायेची शाल पांघरलेली पत्नी, पिलांची किलबिल चाललेल्या घराची धनीण... एक ना दोन, देव देत होता व मी घेत होते; आणि घेता घेता शरीराने पण वाढत होते आणि ती?... एक देणेकरीण होती. आई। भाऊ, बहिणी, मित्रपरिवार... सगळ्यांनी तिच्याकडून घेण्याचा जणू विडा