पान:Bhovara-Iravati Karve.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ११९

ही माहिती त्या वेळी मला नवीनच होती. पुढे काही वर्षांनी जंगलांतून वाहणाऱ्या इतर नद्यांबद्दल व जंगलातील गावांबद्दल हेच प्रवाद ऐकायला मिळाले. ओरिसात दक्षिणेकडील जंगलात कोरापुट म्हणून गाव आहे. तेथील पाणी वर्षाचे सहा महिने जानेवारी ते जूनपर्यंत विषारी असते, असा प्रवाद होता. आपल्याकडे पाटण गावावरून कोयना नदी वाहते, तिच्या पाण्याबद्दलही अशीच समजूत आहे. पाटणला बदली म्हणजे अंदमानावर पाठवणी!' असे एक सरकारी नोकर म्हणताना मी ऐकले. पावसाळ्यात पाणी ठीक असते; पण पावसाळा संपून पाणी कमी होऊ लागले म्हणजे ते विषारी होते, असे कळले. लक्ष्मणा ऊर्फ मनुस्-मारा नदीच्या थोड्याशा पाण्यात इतर दोन नद्यांचे ओघ मिसळले म्हणजे विषाची तीव्रता कमी होत असली पहिजे.
 काम संपतासंपता डासांचा इतका त्रास झाला, की रक्ताचा थेंब तपासणीसाठी काढून घेतला की त्यावर डास यावयास लागले. म्हणून एकजणीने डास वारून दुसरीने तपासणी संपवली. पसारा आवरला आणि शेजारीच असलेल्या एका अंधाच्या खोलीत श्रमपरिहारार्थ गेलो. आठ वाजून गेले होते. दिवभराच्या प्रवासाने शीण आला होता, म्हणून बिछाने पसरले. मच्छरदाणी लावावयास खुंट्या सापडेनात. लक्षावधी डास गुणगुणत होते, म्हणून जाईला म्हटले, “बाई, डोक्यावरून पांघरूण घेऊन नीज' ती म्हणाली, “थांब जरा. काला आजारानं मरणं बरं, का जीव घुसमटून मरणं बरं, ह्याचा आधी विचार करू दे.” दारावरून माणसांची ये-जा सुरू होती; दोघींनाही भूक लागली होती, पण आमचे काम सुरू झाल्यावर जुगलबाबूंनी जी दडी दिली होती त्यांचा अजून पत्ताच नव्हता! सांगायचं कोणाला, म्हणून मी खोलीचे दार लावले व जाईशेजारीच पायापासून डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन पडले.  दाराच्या खडखडाटाने मी दचकून जागी झाले. घड्याळात पाहिले तो साडेदहा वाजले होते. जुगलबाबूंचा आवाज ऐकू आला, “जेवण तयार आहे. येता ना?" मी "हा" म्हणून जाईला उठवले व ती नको म्हणत असताही “तुला एकटीला इथं कुठं सोडून जाऊ? माझ्याबरोबर चल." म्हणून तिच्याबरोबर बाहेर आले. खोलीच्या शेजारी आतला चौक होता व पडवीत आमची दोघींची पाने मांडली होती. “इतर मंडळींची जेवणं झाली वाटत?"