पान:Bhovara-Iravati Karve.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११८ / भोवरा

आत जाऊन लहानशा घरासमोर उभे राहिलो, “इथल्या सीतादेवीच्या देवळाच्या महंताचं हे घर. आज रात्र येथे काढून उद्या पुढे जाऊ. आपल्याला आणायला आलेली मोटर आपण वेळेवर आलो नाही, म्हणून परत गेली, ती उद्या सकाळी येईल"
 आम्ही पुढे झालो. खुर्च्या टाकून काही मंडळी बसली होती. त्यांतला एक पोरसवदा माणूस उभा राहिला. अंगात रेशमी शर्ट, त्याला सोन्याच्या गुंड्या, केसांचा भांग काढलेला, अशी मूर्ती होती. अत्तराचा घमघमाट सुटला होता. “हे इथले महंत श्री साधु अमुक अमुक" म्हणून ओळख करून दिली. मी चकितच झाले; पण मुकाट्याने नमस्कार करून बसले. मला नंतर कळले, की महंत म्हणजे पुजारी.
 माझ्या कामाची माहिती जुगलबाबूंनी त्यांना करून दिली. त्यांनी जिज्ञासेने विचारले, “माझं रक्त तपासता का?" “एका माणसासाठी नळी फोडता यायची नाही," मी उत्तर दिले. तशी ते म्हणले, “मी माणसं जमवतो." म्हणून सर्व सामान काढले. सुमारे २०-२५ नमुने मिळाले व अंधार पडला म्हणून आत जाऊन किटसनच्या उजेडात रक्त तपासणे सुरू झाले. काम चालू असताना प्रश्नोत्तरे होतच होती. “तुमच्या तपासणीनं कोठचा रोग झाला कळतं का हो?" असा नेहमीचा प्रश्न झाला. मी “नाही' म्हणून उत्तर देऊन परत प्रश्न केला, “तुमच्या प्रदेशात रोगराई किती आहे?"
 महंतजी उद्गारले, “किती व कुठचे रोग म्हणून काय विचारता? सर्वाना रोग आहेत; व सर्व प्रकारचे आहेत. काळा आजार आहे; मलेरिया आहे; " रोग आहे; त्याशिवाय दोषी ताप, नवज्वर, पटकी आहे. एवढंच काय, पण नदीचं पाणीसुद्धा विषारी आहे” “कुठल्या नदीचं?" मी विचारले. “ह्या लक्ष्मणा नदीचं. म्हणून तर आम्ही तिला मनूसू-मारा म्हणतो"
 कल्पनेत रचलेल्या गतेतिहासाच्या वैभवशिखरावरून वास्तव दरीत कोसळत गडगडत येणाऱ्या मनाला सावरून मी विचारले, “पण नदीचं पाणी विषारी का?"
 “ह्या नदीचा उगम नेपाळच्या तराईत बचनाग असलेल्या जंगलात होतो व तसल्याच जंगलातून वाहात ती ह्या गावाला येते. म्हणून हिचं पाणी विषारी आहे. पुढे दोनतीन नद्या तिला मिळाल्यावर तिच्या पाण्यातील विषार जातो."