पान:Bhovara-Iravati Karve.pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११४ / भोवरा

गंगेच्या विस्तीर्ण वाळवंटात हजारो माणसे स्नानासाठी गोळा झाली होती. ग्रहण लागावयास अजून चौदा पंधरा तास तरी अवकाश होता. पण मालगाड्या, बोटी, पडाव, खटारे भरभरून माणसे येत होती व कित्येक चालतच आलेली होती. आगगाडीच्या डब्यातच नाही तर बाहेरूनही खिडक्या, दरवाजे- सर्व काही माणसांनी लिंपलेली दिसत होती. जणू पर्वणीच्या दिवसापुरता गुरुत्वाकर्षणाचा सृष्टिनियम ईश्वराने सैल केला होता. इतर सामाजिक बंधनेही त्या दिवसापुरती ढिली झालेली दिसत होती. एरवी घराबाहेर न दिसणाऱ्या बायका पर्वणीच्या निमित्ताने मिश्र समाजात दिसत होत्या; पण तरीही दक्षिणेकडील बायकांचा मोकळेपणा त्यांच्यात नव्हता. त्या पर्वणीच्या दृश्यात काही तरी उणे आहे असे मला वाटत होते. ते म्हणजे सर्व देखावा रंगांनी भरलेला नव्हता. वर चैत्र-वैशाखाचे धूसर वातावरण, खाली गंगेची पिवळसर पांढुरकी रेती आणि वर मळकट पांढरी वस्त्रे नेसलेले स्त्रीपुरुष-असे ते दृश्य होते. प्रदेशही सपाट-पाहावे तिकडे सपाट जमीन क्षितिजाला टेकलेली. मला गंगेचे खोरे कंटाळवाणे वाटू लागले.
 आगगाडी हळूहळू चालली होती. अमक्या ठिकाणी अमक्या वेळी पोचायची काही व्यवस्था होती की नाही कोण जाणे. शेवटी एकदाचे स्टेशनला पोचलो. तेथून पुढचा प्रवास मोटरचा होता व आम्हांला शक्य तर कलेक्टरकडून काही तरी वाहन मिळेल अशी आशा होती, पण आम्हांला उतरून घेण्यासाठी स्टेशनवर तर कोणीच नव्हते. कलेक्टर कचेरीकडे जाऊन चौकशी केली; पण कोठेच दाद लागेना! शेवटी बसस्टॅडवर जाऊन तिकिटे काढली. बस शेवटपर्यंत जाणारी नव्हती; पण इथे वेळ घालवण्यापेक्षा निदान अर्ध्या वाटेवर तरी जाऊन पडावे असा विचार केला. बस निघावयास बराच अवकाश होता, म्हणून आसपासची माणसे बघत बसमध्ये बसून राहिलो. इतक्यात बसस्टॅडवर का गडबड झालीसे वाटले म्हणून तिकडे पाहिले, तर कोणी सरकारी पट्टेवाला कसला तरी चौकशी करीत होता. तो थेट आमच्याकडे आला व पाटण्याहून सीतामढीकडे जाणाऱ्या बाया आम्हीच का, म्हणून विचारले. आम्ही 'हो' म्हटल्यावर तो लवून नमस्कार करून म्हणाला, “तुम्हांला कलेक्टरसाहेबांनी बोलावलं आहे. आता आली का पंचाईत! गाडी सुटायला पंधरावीस मिनिटेच होती. मी कलेक्टरकडे गेले तर नमस्कार होईतो गाडी निघून जायची व मी धड नाही पाटणा न् नाही सीतामढी, अशा भानगडीत मध्येच राहायची! मी म्हटले,