पान:Bhovara-Iravati Karve.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०४ / भोवरा

 येथे दुसरे कोणी अधिकारी नाहीत का?"
 नाही, मुख्य ग्रामसेविका रजेवर गेली आहे."
 मी म्हटले, “मग मला शक्य तितक्या लौकर परत जाऊ दे. निदान आज रात्रीपर्यंत पठाणकोटला गेले तर परतीची गाडी तरी मिळेल"
 तो कारकून नको नको म्हणत होता तरी मी निघालेच. सुदैवाने परतीची गाडी मिळाली. हा सर्वच प्रवास अगदी त्रासाचा झाला होता. पंजाबच्या खेड्यांतून रणरण उन्हात हिंडले होते. कुलू संपले की राजस्थानात जायचे असे ठरवून अतिशय थकले असूनही तशीच निघाले होते. महिनाभर आधी, 'मी येणार, व्यवस्था व्हावी' म्हणून पत्र जाऊनही त्या कारकुनाच्या गबाळेपणामुळे मला व्यर्थ वळसा पडला होता. असो. गाडी लौकर मिळाली, आता पठाणकोटला पोचता येईल, याबद्दल आनंद मानीत मी निघाले. हवा सुंदर थंड होती. अर्ध्या वाटेवर भरून येऊन, खूप गडगडाट होऊन पाऊस पडायला सुरुवात झाली. हिमालयातला गडगडाटही ऐकण्यासारखा असतो. आपल्याकडे ढगांचा गडगडाट एका दिशेने येऊन दुसरीकडे जाताना ऐकू येतो. हळूहळू आवाज कमी कमी होतो. येथे आवाज दरीत अडकून घुमत राहतो. एकदा या बाजूने. एकदा त्या बाजूने असा आदळताना ऐकू येतो. वातावरण एकदम रौद्र रूप धारण करते. दरीच्या मुशीतून वारा जोराने वाहू लागतो. उंच डोंगरांच्या भिंतीमुळे आधीच प्रकाश मंद असतो. तो आणखीनच कमी होतो. मोटर हळूहळू चालली होती, ती एकदम थांबली. रस्त्यावर आडवा अडसर टाकला होता. एक पोरगे तांबडे निशाण घेऊन उभे होते. अर्ध्या फर्लांगावर रस्त्याच्या मधोमध एक प्रचंड शिळा वरून कोसळली होती. कामकरी सुरुंग लावून तिला फोडीत होते. तास दोन तास तरी खोटी होणार होती. झालं- आता कसलं पठाणकोट! परत एक रात्र मंडीला काढावी लागणार! मनातल्या मनात त्या कारकुनाला परत शिव्या दिल्या. पण काही झाले तर पठाणकोटला आज पोचणे शक्य नाही हे समजल्याबरोबर मनावरचा ताण कमी झाला. बियासचे सौंदर्य अनुभवीत असताही, वेळेवर पोहोचू आगगाडीत जागा मिळेल ना, वगैरे काळजी मनात होती तीही नाहीशी झाली. त्या थंडीवाऱ्यात व गडगडाटात मला सीटवरच अगदी गाढ झोप लागली. मी जागी झाले ती बस चालू झाल्यामुळे.