पान:Bhovara-Iravati Karve.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०२ / भोवरा

नदीचा वाहण्याचा जोर कमी होईल. आपल्या महाराष्ट्रांतल्या नद्यांप्रमाणे त्या वाहतील अशी कल्पनाही करता येत नाही. कारण वाहून नेलेल्या गाळाने गंगेचे खोरे जसजसे भरून वरती येत आहे, तसतसा हिमालय पर्वतही म्हणे उंच उंच वाढत आहे! या नद्या म्हणजे शंकराच्या संहारक शक्तीचे दृश्य रूपच आहेत. त्यांचे सौंदर्य जसे अनुपम, तसेच त्यांचे रौद्र स्वरूपही मन व डोळे ओढून घेणारे.
 गाडी अगदी रूक्ष चढ चढत होती. रणरणत होते. चढ काही केल्या संपत नव्हता. तेरा हजार फूट याप्रमाणे चढलो. एका बाजूला वैजनाथचे डोंगर व दुसऱ्या बाजूला बियास नदीचे अरुंद पात्र व तिच्या काठी वसलेल ‘मंडी' गाव दिसले. दुसऱ्या क्षणी हे दृश्य नाहीसे होऊन गाडी वळणावळणाने उतरू लागली. थेट मंडीपर्यंत गाडी उतरत होती. मंडीत एक सुंदर भव्य राजवाडा आहे. एकंदर गाव सुंदर पण गलिच्छ आहे. कुलूच्या गाड्या निघून गेल्या होत्या व रात्र काढणे मला भाग होते. एका डोंगराच्या टोकावर सुंदर डाकबंगला आहे; पण तेथे चढून जायचे व पहाटे सामान घेऊन उतरायचे म्हणजे दिव्यच. सांगितलेला हमाल वेळेवर आला नाही तर वळकटी व पेटी घेऊन मैलभर पहाटेच्या अंधुक उजेडात आपल्याच्याने काही चालवायचे नाही असा विचार करून बस स्टैंडजवळच्याच हॉटेलात एक खोली घेतली. असेच कुठेतरी जेवण उरकले व खोलीत येऊन पडले. इतका वेळ मनस्वी उकडत होते. आता भरभर ढग जमून गडगडाट, विजा व पावसाला सुरुवात झाली. भल्या पहाटे गाडी निघायची होती. एक चुकली की तीनचार तास दुसरी मिळत नाही. कारण हिमालयात सर्वत्र 'गेट'ची पद्धत आहे. या पद्धतीने गाड्यांची वाहतूक एकेरी असते. रस्ते अरुंद, खाली खोल नदीचे पात्र व दरडी कोसळण्याचे भय यामुळे फक्त एकेरी वाहतूक ठेवतात. पहिल्या गेटात सकाळी सहा ते सात मंडीहून कुलूला जाणाऱ्या व कुलूहून मंडीला येणाऱ्या गाड्या दोन्ही बाजूंनी सुटतात. साधारण अर्धी वाट गेले की एक मोठे गाव लागते. तेथे दोन्हीकडच्या गाड्या आल्या की पोलिस मंडीच्या गाड्या कुलूकडे व कुलूच्या मंडीकडे सोडतो. या गावी बराच वेळ मुक्काम असतो. म्हणून पहाटे निघालेल्या लोकांची चहा पिण्यासाठी एकच गर्दी उसळते. गाड्या मुक्कामी पोचल्या की दुसऱ्या गेटच्या गाड्या सुरू होतात.