पान:Bhovara-Iravati Karve.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १०१

 हळूहळू सपाटी संपून गाडी चढणीला लागली. एका बाजूला बियासचे विस्तृत खोरे व दुसऱ्या बाजूला बियास व रावी यांमधील पाणलोट असलेली पर्वतश्रेणी होती. पण खोरे काय, वा डोंगर काय, फार दूरपर्यंतचे दिसतच नव्हते. डोंगरातून सगळीकडून पाणी वाहात होते. हवेत गारठा आला होता. देवदाराची झाडी पण लागली. एका डोंगराच्या कडेला एक सुंदर देऊळ दिसले. ते बैजनाथचे होते. आमची गाडी वैजनाथला थांबली. येथे खूप गाड्या थांबल्या होत्या. उतरून परत चौकशी केली. कुलूहून कोणी आले नव्हते. थेट कुलूला जाणारी बस पण नव्हती. स्टॅडवरून देऊळ दिसत नव्हते, पण जवळच आहे असे समजले म्हणून तिकडे गेले. देऊळ बंद होते. बाहेरच्या आवारातून काही देखावा दिसतो का पाहिले. धुळीमुळे काहीसुद्धा दिसले नाही. हिरमुसली होऊन परत गाडीत येऊन बसले. येथून पुढे, हिमालयात लागतो तसा, प्रचंड घाट लागला. मैलन् मैल वाकणावाकणाने गाडी सारखी चढत होती. डाव्या बाजूला, पाणी झिरपणारी पर्वतांची भिंत व उजव्या बाजूला सर्वत्र खोल; घळी असलेले बियासचे खोल खोरे. खरे म्हणजे बियास दिसतच नव्हती. ती खूप लांब गेली होती. तिला मिळणाच्या लहानलहान प्रवाहांनीच या असंख्य दरडी खणल्या होत्या. हिमालयातल्या नद्यातून खोरी, फावडी वाहत येतात की काय कोण जाणे? मनुष्याला व इतर प्राण्यांना व वनस्पतींना पाणी पुरवणे हे त्यांच्या दुय्यम कामांपैकी वाटते. मुख्य काम म्हणजे माती उकरण्याची लहान लहान यंत्रेच. पाण्याच्या प्रवाहाच्या जोराने व दगडाच्या घासण्याने तीरावरचे प्रचंड विभाग खालून कापून काढलेले असतात. शेकडो फूट उंचीची खालून कापून काढलेली भिंत पाण्यावर अधांतरी लोंबती दिसते. असे वाटते की, थोडा वेळ पाहात उभे राहिले, तर डोळ्यांदेखत कित्येक फूट पर्वत खाली कोसळेल. खरोखरच दरवर्षी ठिकठिकाणी हिमालय असा कोसळत असतो. असा ढिगारा कोसळला, की नदीला तात्पुरता बांध उत्पन्न होतो. बांधामागे नदीचे पाणी वाढत राहते, बांधामागची खेडेगावे-शेते वाहून बुडूनसुद्धा जातात. एक दिवस पाण्याचा दाब इतका वाढतो, की फुगलेला प्रवाह ढिगाऱ्याचा बंधारा फोडून धो धो बाहेर पडतो. मग बंधाऱ्याखालच्या तीरावरील दरडी कोसळतात, गावे बुडतात, शेते वाहून जातात. हिमालयातील सर्वच "नद्याच्या खोऱ्यांतून हे दृश्य दिसते. नद्या वाहून वाहून पर्वत ठेंगणे होतील.