पान:Bhovara-Iravati Karve.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१० / भोवरा

 किती वर्षे झाली त्या गोष्टीला! हिमालयाला जाण्याची कल्पना आम्ही सोडून दिली नव्हती; पण जमत नव्हते खरे! तेवढ्यात आई बद्रीकेदाराला जाऊन आली व आम्ही पण तिकडेच जायचे नक्की केले; पण घरातून पाय निघेना! त्याची-माझी सुट्टी जमेना. दर सुटीत काही ना काही काम व सुटी मोकळी मिळाली, तर इतक्या लांबच्या प्रवासासाठी लागणारी रोकड नाही! बाकी सर्व आहे तर मुले व घर कोणावर सोपवावे ही पंचाईत. शेवटी एक वर्ष असे उजाडले, की काही झाले जायचेच असा निश्चय केला; कोठचेही काम सुटीत घ्यायचे नाही असे ठरवले; आईने मुले, घर, मामंजींना सांभाळण्याचा पत्कर घेतला व आम्ही एकदाचे निघालो. बरोबर माझ्या सत्तर वर्षांच्या एक वन्सं पण होत्या.
 निधर्मी राज्यव्यवस्थेमुळे पुणे ते हृषीकेश व हृषीकेश ते पुणे अशी स्वस्त दराची तिकिटे मिळाली नाहीत. पुणे ते डेहराडून व परत अशी तिकिटे मिळाली–का, तर म्हणे कोठच्याही थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास स्वस्त तिकिटे मिळतात. पण यात्रेला मिळत नाहीत!
 शेवटी एके दिवशी सकाळी प्रवासास सुरुवात झाली. युगानुयुगे प्रवास चालला होता, मला वाटते. सह्याद्री, सातपुडा, विंध्य ह्यांच्या तापलेल्या भिंती ओलांडून आग ओकणारे गंगायमुनांचे सपाट खोरे लागले. दिवस वा रात्र, उकाड्यात काहीच फरक नव्हता. दिवसा उन्हात पळणारे मृगजळ दिसे. रात्री काळ्याकुट्ट काळोखात काही दिसत नसे. लोखंडाची भट्टी खालून तापली होती, वर आकाशाची कढतकढत काळीशार कढई पालथी घातली होती व मध्ये माणसे की बिस्किटे भाजून निघत होती! अधूनमधून भट्टीचे दार उघडे. खुसखुशीत भाजलेले जिन्नस बाहेर निघत व नवेनवे कच्चे जिन्नस आत येऊन रिकाम्या जागेवर बसत व भट्टीचे दार धाडकन् बंद होई ! रात्रभर असे चालले होते. मी म्हणे, “एवढी कुणाची मेजवानी आहे की अजून हे केक-बिस्किटांचं भाजणं संपत नाही!" एवढ्यात गार वारयाची झुळूक आली. “छे! छे! बिघडली सारी भट्टी ! तापलेल्या मालावर अशी गार हवा लागून कसं चालेल?" आणखी एक गार झुळूक आली व ग्लानीने मिटलेले डोळे मी उघडले. उत्तर भारताचे मैदान संपून आगगाडी हिमालयाच्या टेकड्यांवर आली होती. दोन्ही बाजूंनी जंगल होते व सकाळच्या प्रहरी झाडे टवटवीत दिसत होती. आम्ही डेहराडूनच्या वाटेला लागलो होतो.