पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/510

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४९४]

आजपर्यंतच्या प्रकृतिमानाची पूर्ण माहिती पाहिजे. तेव्हां हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थिति कळण्याकरितां हिंदुस्थानच्या पूर्वस्थितीची माहिती पाहिजे; परंतु ही माहिती संगतवार अशी कोठेंही नाहीं. कारण युरोपांतील देशांप्रमाणें हिंदुस्थानचा औद्योगिक इतिहास उपलब्ध नाहीं. कारण तशा दृष्टीनें अजून हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास लिहिलेला नाहीं व त्याच्या अभावामुळे सद्यःस्थितिसंबंधीं केलेला अंदाज चुकण्याचा संभव असतो व त्यामुळे उपाययोजनाही चुकण्याचा संभव आहे.
  हिंदुस्थानच्या पूर्वस्थितीच्या अज्ञानामुळेच या विषयाच्या विवेचनांत तिसरी एक अडचण उत्पन्न झालेली आहे. ही अडचण म्हणजे तीव्र मतभेदाची होय. ज्याप्रमाणें एखाद्या विचित्र रोगानें पछाडलेल्या मनुष्याशेजारीं दोन डॅक्टर बसावेत व रोग्याच्या लक्षणांच्या परीक्षेवरून त्यांनीं परस्पर विरुद्ध अशी रोगचिकित्सा करावी व अर्थात या रोगचिकित्सेच्या भिन्नतेमुळे या दोघांची औषधयोजना अगर उपाययोजनाही भिन्न व प्रसंगीं परस्परविरोधी व्हावी हें साहजिकच आहे. तशीच गोष्ट हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीच्या बाबतींत झालेली आहे. एका पक्षाचें म्हणणें हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थिति पूर्ण भरभराटीची आहे व या निदानाचा खरेपणा भासविणारीं लक्षणेंही हा पक्ष दाखवू शकतो. कारण रोग्याचा रोग विचित्र तऱ्हेचाच असल्यामुळें लक्षणांमध्यें कांहीं कांहीं लक्षणें आरोग्यसूचक व शरीरसामर्थ्यसूचक भासतात हें खोटें नाहीं. दुस-या पक्षाचें निदान याच्या अगदीं उलट आहे. तो म्हणतो कीं, हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिति अगदीं खालावत चाललेली आहे; या रोग्याची शक्ति दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे व रोगी आतां थोड्याच दिवसांचा सोबती आहे. या निदानाच्या समर्थनार्थ हा पक्ष रोग्याच्या हातापायांच्या झालेल्या काड्यांकडे बोट दाखवितो व सशक्त माणसाच्या एकंदर शरीरशक्तीकडे बोट दाखवून " हें चित्र पहा व तें चित्र पहा " असें प्रतिपादन करतो व यामुळें या पक्षाचें म्हणणें खरें भासतें. प्रत्यक्ष रोग्याला विचारावें तर त्याचें म्हणणें आपण अत्यंत खंगत चाललों आहों असेंच पडतें. परंतु हें त्याचें विधान त्याच्या निरोगी स्थितीशीं तुलना करून केलेलें असतें. समजा कीं, एखादा मनुष्य मोठ्या भयंकर रोगानें आजारी पडून बेशुद्ध पडला व पुढें हळूहळू तो शुद्धीवर येऊं लागला. आतां ज्या डेॉक्टरानें