पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/471

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४५५]

एक प्रकारचा कर जहागिरदार, इनामदार वगैरे श्रीमंत लोकांवर कजाच्या फेडीकरितां बसविल्याचे दाखले आहेत. यावरून युरोपांत ज्याप्रमाणें कांहीं कर राष्ट्रीय कर्जाचे व्याजामुदलाच्या फेडीकरितां निराळे काढून ठेवितात, त्याप्रमाणें पेशवाईतील पद्धत होऊं पहात होती असें वाटतें. कराचा वसूल हळू हळू होत असतो; परंतु सरकारला केव्हां केव्हां पैशाची एकदम जरूर लागते. तसेंच पुढें वसूल होणा-या कराचा पैसा आधींच खर्च करण्याची पाळी येते. अशा वेळीं युरोपांत सरकार बँकांकडून पैसे घेतें व मग जसजसा कराचा वसूल होईल तसतसा पैसा बँकेंत भरला जातो व या तात्पुरत्या कर्जावरही बँकेस व्याज मिळतें. ही पद्धतही पेशवाईच्या कारभारांत वारंवार दृष्टोत्पत्तीस येते. पेशव्यांना पैशाची गरज लागली व खजिन्यांत पैसे नसले तर ते एखाद्या जिल्ह्याच्या किंवा प्रांताच्या जमीनसा-याइतका पैसा एखाद्या सावकाराकडून किंवा इतर योग्य माणसाकडून १५ टके कसरीबद्दल कापून देऊन आगाऊ घेत व तो प्रांत किंवा जिल्ह एका वर्षाच्या करारानें जमीनबाबीच्या वसुलीकरितां त्याचे हवालीं करीत. म्हणजे या तात्पुरत्या व थोड्या मुदतीच्या कर्जाकरिता सुद्धां पेशव्यांना १५ टके व्याज यावें लागे. पुष्कळ दिवसांच्या मुदतीनें काढलेल्या कर्जावर तर यापेक्षांही जास्त व्याज द्यावें लागे. शेंकडा २० हा व्याजाचा साधारण दर असे. परंतु शेंकडा ३०-३५ व्याज दिल्याचे उल्लेख पेशवाईदफ्तरांत व कागदपत्रांत सांपडतात !
 राष्ट्रीय कर्जाच्या पद्धतीला अनुकूल स्थिति युरोपांत असल्यामुळें या पद्धतीचा फैलाव युरोपच्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांत अतोनात झाला आहे. राष्ट्र जेवढें मोठें, धनसंपन्न व बलाढ्य तितकें त्याचें राष्ट्रीय कर्ज मोठे ! जणूं कांहीं राष्ट्रीय कर्जाची वाढ ही सुधारणेच्या व संपन्नतेच्या वाढीची खूणच आहे! ज्याला इंग्रजी इतिहास व अर्थशास्त्र यांची चांगलीशी माहिती नाहीं त्याला हें काय गौडबंगाल आहे असें वाटतें ! इंग्लंडसारखा सर्व जगामध्यें धनाढ्य देश, पण त्याचें राष्ट्रीय कर्ज अजमासें ७४ कोटी पौंड आहे. त्याचें वार्षिक व्याज २॥ कोटी आहे. अमेरिका तर संपत्तीत इंग्लंडच्यापुढें जात आहे. व त्या देशाच्या अवाढव्यतेप्रमाणें त्याचें राष्ट्रीय कर्जही अवाढव्यच आहे.अमेरीकेचें कर्ज हल्लीं सुमारें २॥अब्ज डॉलर्स इतकें आहे.अशीच युरोपांतल्या इतर राष्ट्रांची स्थिति आहे. फ्रान्सचें कर्ज सुमारें