पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/440

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४२४ ] स्वतःच कवाईत करतात. ग्रीक लोकांमध्यें पहिली पद्धति सुरू होती. त्या काळीं अथीनीयन नागरिकांचें लष्करी शिक्षण हें त्यांच्या इतर शिक्षणाचाच एक भाग समजला जात असे. महाराष्ट्रांत पूर्व काळीं लोक आपआपले लष्करी खेळ खेळत व मर्दानी खेळ खेळत. दुसऱ्या पद्धतींतील शिपाई हे नेहमीं शिस्तीनें राहण्यास शिकलेले असतात. यामुळे आज्ञापालन, व्यवस्थितपणा व नियमितपणा हीं त्यांच्या अगदीं अंगवळणीं पडलेलीं असतात. म्हणून असें सैन्य नागरिक सैन्यापेक्षां जास्त चांगलें असतें. पूर्वीच्या युद्धपद्धतींत शिपायाचे अंगचें व्याक्तिक शौर्य व त्याचें कौशल्य हे गुण महत्वाचे होते. परंतु दारूच्या व बंदुकादिकांच्याशोधापासून या व्याक्तिक गुणाचें महत्व कमी झालें आहे. अर्वाचीन काळच्या युद्धपद्धतींत व्यवस्था, नियमितपणा व आज्ञापालन या गुणांना महत्व आलेलें आहे व हे गुण ठेविलेल्या सैन्यांत जास्त प्रमाणानें असतात हें वर सांगितलेंच आहे. यामुळे अर्वाचीन काळीं अशा सैन्याला फार महत्व आलेलें आहे. नागरिक सैन्यापेक्षां ठेविलेलें सैन्य हें बहुधा जास्त चांगलें असतें हें सर्व इतिहासावरून सिद्ध होतें. फिलीप व शिकंदर बादशहा यांचे विजय हे या सैन्याचाच प्रभाव होत. कार्थेज व रोममधील लढाईत हेंच दिसून येतें. कार्थजचें सैन्य ठेविलेलें होतें. व रोमनचें सैन्य नागरिक होतें. परंतु लढाई पुष्कळकाळपर्यंत चालू राहिली म्हणजे सरावानें नागरिक सैन्यही भाडोत्री सैन्यांच्या बरोबरीचें बनतें. लोकसत्तात्मक राज्यांना सैन्य कायम ठेवण्याची भीति वाटते; कारण त्यायोगें आपलें स्वातंत्र्य नष्ट होईल अशी त्यांना धास्ती वाटते. परंतु जर शिपायांना शांतता राखण्यांत फायदा असला तर प्रजेच्या स्वातंत्र्यरक्षणास यासारखा दुसरा उत्तम उपाय नाहीं. कारणी कायमचें सैन्य असलें म्हणजे सरकारला लोकांच्या थोड्याफार असंतोषाकडे दुलक्ष केलें तरी चालतें. कारण हा असंतोष भाषणद्वारां व लेखनद्वारां वितळून जातो. परंतु असें सैन्य नसल्यास सरकारला असंतोषाच्या बारीक प्रदर्शनाकडे लक्ष देऊन लोकांना कडक शिक्षा करावी लागते. या कायम सैन्याच्या पद्धतीनें एखाद्या राष्ट्राला ताबडतोब सुधारणेंच्या वरच्या पायरीवर आणतां येतें. पीटर धि ग्रेट यानें थोड्या काळांत रशियामध्यें जी सुधारणा घडवून आणली ती या सैन्याच्यायोगानें होय.