पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/438

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४२२ ] झालें. कारण वर्षाच्या या वेळांत शेतकींचें काम फार मेहनतीचें किंवा जोखमीचें नसतें. तें बायकामुलें सहज करूं शकतात. यामुळें लढाईवर जाणाऱ्या लोकांना सुद्धां आपल्या शेतकीच्या उत्पन्नावर निर्वाह करतां येतो. परंतु लढाई किंवा स्वाऱ्या या काळच्यापलीकडे चालू राहिल्या तर मात्र शिपायांना सरकारकडून पगार मिळणें अवश्य होतें. कारण स्वारीवर गुंतलेल्या लोकांना आपल्या शेताची लागवड करणें शक्य नसतें व म्हणून शेतीच्या लागवडीचें काम पगारी मजूरांकुड़न करून घ्यावें लागतें. या म्हणण्याचें प्रत्यंतर इतिहासावरून मिळतें. पूर्वकाळीं ग्रीक लोकांमध्ये स्वाऱ्याचा काळ म्हणजे पिकाच्या हंगामापासून तों पेऱ्याच्या हंगामापर्यंतच असे. व त्या वेळीं शिपायांना पगारही मिळत नसे. परंतु पुढें जशा लढाया व स्वाऱ्या या स्वाभाविक हंगामापलीकडे जाऊं लागल्या तशी पगार देण्यांची पद्धति सुरू झाली. आपल्या महाराष्ट्रांतील इतिहासावरुन हीच गोष्ट दिसते. यामुळेच दसऱ्याच्या सणाचें येथें इतकें महात्म्य आहे. दसरा झाला म्हणजे पावसाळा संपतो. व शेतीचें कामही संपतें. यामुळे दस-यानंतर स्वाऱ्या करण्यास निघण्याचा मराठयांचा संप्रदाय असे. परंतु समाज सुधारणेच्या पुढील पायरीवर चढला म्हणजे संरक्षणाचा खर्च फार वाढतो. याचीं दोन कारणें आहेत. पहिलें कारखान्यांची व धंद्यांची वाढ व दुसरें लढाईच्या कलेची प्रगति होय. देशामध्यें कारखान्यांचा उदय होऊन पुष्कळ लोक शिल्पकलेवर आपली उपजीविका करूं लागले म्हणजे शिपायांना पगार देण्याची अवश्यकता उत्पन्न होते. कारण कामदारांची उपजीविका त्यांच्या रोजच्या श्रमावर व मजुरीवर होते व सरकारनें त्यांना लढाईवर पाठविलें कीं त्यांचें पोट त्यांना भरतां येत नाहीं. यामुळे त्यांच्या स्वतःच्या पोटापुरता व कुटुंबाच्या पोषणास अवश्यक इतका पगार त्यांना द्यावा लागतो. दुसरें या समाजाच्या स्थितींत लष्करी शिक्षणाची अवश्यकता उत्पन्न होते व त्याचाही खर्च वाढतो हें मागें सांगितलेंच आहे. समाजाच्या पहिल्या तिन्ही अवस्थांमध्यें हा प्रक्ष उद्भवत नाहीं. मृगयावृत्ति - मनुष्याचा नेहमीचा व्यवसाय म्हणजे लष्करी शिक्षण असतें. गोपालवृत्ति व कृषिवृत्ती समाजांत लोकांना पुष्कळ फुरसत असते व त्यांमध्यें घोड्यावर बसणें, कुस्ती खेळणें, नेम मारणें वगैरे मदांनी खेळ व शक्ति व हिंमत वाढविणारे