पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/427

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४११] तत्वामध्यें मात्र विरोध आहे म्हणजे त्या तत्वाप्रमाणें देशांमध्य खुला व्यापार पाहिजे बाहेर मात्र संरक्षण पाहिजे असें म्हणतात व या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. यावर संरक्षणवाद्यांचें उत्तर अगदीं सरळ आहे देशादेशामध्यें श्रम व भांडवल यांचें कितीही स्थानांतर झालें तरी सर्व संपत्ति देशामध्यें राहते; परंतु खुल्याव्यापारानें जर श्रम व भांडवल देशाबाहेर गेले तर राष्ट्रीयदृष्ट्या तोटा झाला व असा तोटा न व्हावा अशाकरितांच संरक्षण पाहिजे. आतां संरक्षणाच्या बाजूनें सामान्यतः जीं प्रमाणें पुढें आणिलीं जातात त्यांचा थोडक्यांत विचार केला पाहिजे. पहिलें प्रमाण-व्यापाराचें समतोलन-उदीमपंथाचा या प्रमाणावर फार भर असे. त्याचे मतानें देशाचा निर्यातव्यापार आयातव्यापारापेक्षां नेहमीं जास्त असला पाहिजे म्हणजे व्यापाराचें समतोलन देशाला अनुकूल पाहिजे तरच देशांत संपत्तीची वृद्धि होत जाईल व देश भरभराटत जाईल व निर्यातव्यापाराला उत्तेजन येण्याकरितां बक्षीस, जकातीच्या सवलती वगैरे उपाय योजले पाहिजेत व आयातव्यापार कमी होण्याकरितां त्यावर जबर जकाती बसविल्या पाहिजेत व अशा प्रकारचे उपाय योजणें म्हणजेच संरक्षणपद्धतीचा अंगीकार करणें होय. परंतु अर्वाचीन काळीं या प्रमाणाचा फोलपणा उघड झालेला आहे. कारण बहिर्व्यापाराच्या मीमांसेंत असें दाखविलें आहे कीं, आयात व निर्यात या परास्परावलंबी गोष्टी आहेत व आयात व निर्यात माल यांची परस्पर अदलाबदल होते व यामुळे दुसरीं कारणें अस्तित्वांत नसलीं तर हे दोन्ही व्यापार सारखेच होण्याचा कल असतो. शिवाय व्यापाराचें समतोलन ही देशाच्या संपत्तीची किंवा भरभराटीची मुळीं कसोटीच नाहीं. इंग्लंड हा देश सांपत्तिक भरभराटींत आहे तरी पण त्या देशाच्या विशेष परिस्थितीमुळे त्या देशाचा आयातव्यापार निर्यातव्यापारापेक्षां नेहमींच जास्त असतो. युनायटेड स्टेट्स सांपत्तिक भरभराटीत असतांना त्या देशाचा निर्यातव्यापार आयातव्यापारापेक्षां मोठा आहे. हिंदुस्थानच्या विशेष परिस्थितीमुळे हिंदुस्थानचा निर्यातव्यापार आयातव्यापारापेक्षां सदोदित जास्त असतो. परंतु यावरून हिंदुस्थानची भरभराट होत आहे असें सिद्ध होत नाही. कारण हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिति सुधारत आहे