पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/422

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

206 लष्करी खात्यांतील युरोपियन नोकरांचीं पेन्शनें हिंदुस्थानांतून जावयाचीं असतात. आतां हा जो इतका पैसा हिंदुस्थानांतून इंग्लंडमध्यें जावयाचा असतो तो कांहीं प्रत्यक्ष पैशाच्या रूपानें जात नाहीं. तर तो मालाच्या रूपानें जातो. व म्हणून हिंदुस्थानच्या निर्यात मालाची रक्कम सदोदित मोठी असते. व व्यापाराच्या देवघेवी पुऱ्या होण्यास स्टेट सेक्रेटरीच्या कौंसिल बिलाचा उपयोग होतो. स्टेट सेक्रेटरीला हिंदुस्थान सरकांकडून वर निर्दिष्ट केलेल्या कारणाकरितां जे पैसे घ्यावयाचे असतात त्या पैशाइतकीं रुपयांमध्यें स्टेट सेक्रेटरी कौंसिल बिलें काढतो. हीं कौंसिल बिलें म्हणजे स्टेट सेक्रेटरीच्या हिंदुस्थानच्या तिजोरीवरील हुंड्याच होत व हीं बिलें बाजारांत विकली जातात. तसेंच, इंग्लंडांतील निर्यात व्यापारी आपण हिंदुस्थानांत पाठविलेल्या मालाबद्दल विनिमयपत्रे काढीत असतात व हीं विनिमयपत्रे व कौंसिल बिलें या हिंदुस्थानावर काढलेल्या हुंड्याप्रमाणें होत. आतां या दोहोंला मागणी हिंदुस्थानांतून ज्यांनीं विलायतेंत माल मागविला आहे अशा विलायतेंतील आयात व्यापाऱ्यांची होय. कारण त्यांना हिंदुस्थानांत पैसे पाठवावयाचे असतात. याप्रमाणें हिंदुस्थानांतील हुंडणावळीचा भाव ठरतो. हिंदुस्थान सरकार वर ज्या हुंड्या आल्या असतील त्या आपल्या तिजोरीमधून पटवितें. परंतु हिंदुस्थानच्या तिजोरींत पैसे करापासून येतात. हिंदुस्थानांत शेतसारा ही कराची मुख्य बाब असल्यामुळे कर देण्याकरितां शेतकऱ्यांना आपला कच्चा माल बाहेर देशीं पाठवावा लागतो व त्याच्या येणाऱ्या पैशांतून कराची भर करावी लागते. याप्रमाणें विनिमयपत्राच्यायोगानें बहिर्व्यापाराच्या विराटस्वरूपी घडामोडी होतात. या घडामोडींमध्यें प्रत्यक्ष सोन्यारुप्याच्या नेआणीची फारशी गरज पडत नाहीं. परंतु देशादेशांमधील देवघेवीच्या सर्व बाबींची वजावाट होऊन शेवटीं जो देवघेवीचा अवशेष राहील तो सोन्यारुप्याच्यायोगानेंच फेडला गेला पाहिजे व म्हणून थोड्याबहुत प्रमाणावरही सोन्यारुप्याची आयात-निर्यात प्रत्येक देशांत होत असते असें आपल्याला आयात निर्यातीच्या विशिष्ट कोष्टकावरून दिसून येतें. आतां या भागांतील एकच वादग्रस्त प्रश्न राहिला तो संरक्षण विरुद्ध अप्रतिबंध व्यापार हा होय. त्याचा एका स्वतंत्र भागांत विचार करुन या विनिमयाच्या पुस्तकाची समाप्ति करण्याचा विचार आहे.