पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/419

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४०५] द्यावयाचा असेल. शेवटीं व्यापार हा देन देशांशीं परस्पर असतो असें नाही; तर एका देशाचा व्यापार दुस-या पुष्कळ देशांशीं असेल व ज्या देशाचा व्यापार सर्व जगाशीं मोठ्या प्रमाणावर असेल त्या देशामध्यें सर्व देशांतील विनिमयपत्रे जमत असतील व त्यामुळे त्या देशाच्या विनिमयपत्राच्याद्वारें निरनिराळ्या देशांतील देवघेवी होत असतील. जगांतील सर्व देशांशीं इंग्लंडचा व्यापार असल्यामुळे व जगांतील बहुतेक सर्व देशांना इंग्लंडनें कर्ज दिलेले असल्यामुळे लंडन हें सर्व विनिमयपत्राची विल्हेवाट लावणारें सर्व जगांतील देवघेवीची फेड करणा-या पेढ्यांचें केन्द्रस्थान बनलें आहे. वरील सर्व कारणांमुळे निरनिराळ्या देशाच्या आयात-निर्यात व्यापाराची स्थिति भिन्न असते. उदाहरणार्थ, इंग्लंडांत आयात माल निर्यात मालापेक्षां सदा जास्त असतो. याचें कारण इंग्लेंडनें सर्व जगाला कर्ज पुरविलें आहे. त्या कर्जाचें व्याज इंग्लंड आपल्याला पाहिजे असलेल्या मालाच्या रुपानें घेतें. तसेच जगांतील पुष्कळ नेआणीचा व्यापार इंग्रजी गलबतामधून होतो. यामुळे याबद्दलचा नफा आयात मालाच्या रूपानेंच येतो. तसेंच इंग्रजी साम्राज्यांतील पुष्कळ भागांची राज्यव्यवस्था इंग्रज लोकांच्या हातांत असल्यामुळे या लोकांच्या पगाराची तसेंच बाहेर देशीं व्यापार करणा-या इंग्रजाच्या नफ्याची शिल्लक ही आयात मालाच्या रुपानें इंग्लंडांत पोंचविली जाते. वरील सर्व कारणांवरून इंग्लंडांत आयात मालाचा निर्यात मालापेक्षां सदोदित अतिरेक कां असतो याचें स्पष्टीकरण होतें. याच्या उलट उदाहरण हिंदुस्थानचें आहे. हिंदुस्थानच्या निर्यात व्यापाराची रक्कम आयात मालापेक्षां नेहमींच जास्त असते. परंतु इतके पैसे देशांत येतात असा मात्र त्याचा अर्थ नाहीं. हिंदुस्थानानें इंग्लंडांतून कर्ज घेतलेलें आहे. त्याचें व्याज दर वर्षास विलायतेस पाठवावें लागतें. तसेच हिंदुस्थानांतील घाऊक व्यापार व नेआणीचा व्यापार इंग्रजी व्यापारांच्या ताब्यांत आहे. या सर्व व्यापारावरील नफा हिंदुस्थानांतून जावयाचा असतो. शिवाय हिंदुस्थानच्या कारभारांत पुष्कळ इंग्रज लोक असतात त्यांच्या शिलकी तिकडे जावयाच्या असतात. व शेवटीं हिंदुस्थानचा कारभार चालविण्यास इंडिया कौंसिल आहे. त्याचा खर्च हिंदुस्थानांतून जावयाचा असतो. हिंदुस्थानांत जें युरोपियन सैन्य नेहमीं असतें त्याच्या पूर्व शिकवणीचा खर्च हिंदुस्थानास यावा लागतो. व शेवटीं दिवाणी व