पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/398

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३८६ ]

बँकेची पद्धति सुरु केली. याचे इंग्लंडांत सुमारें ५० वर्षे खासगी प्रयत्न झाले. तें तत्त्व गरीब लोकांच्या फार उपयोगी आहे. कारण या बँकेंत अगदीं चार आण्यांपासून सुद्धां ठेवी घेतल्या जातात. या बँकांमुळे लोकांना काटकसराची व संचयाची संवय लागते व लोकांना या संचयाचा आणीबाणीच्या प्रसंगीं फार उपयोग होतो. पोस्टल बँकेंतील संचयावरून लोकांच्या सुस्थितीचा व नीतिमत्तेचा अंदाज चांगल्या त-हेनें काढतां येतो. या बाबतींत सर्व युरोपामध्यें फ्रान्सचा पहिला नंबर लागतो. फ्रान्समध्यें गरीब लोक फार काटकसरी व संचयी असल्याबद्दल ख्याति आहे. यामुळे फ्रान्समधले इतर सर्व देशांपेक्षां गरीब रयतेची बरीच चांगली स्थिति आहे. आमच्या हिंदुस्थानांतील गरीब लोक काटकसरी व संचयी आहेत. सरकारी अंमलदार शेतक-याच्या दारिद्रयाचें कारण आमच्या लोकांच्या उधळपट्टीवर लादतात. परंतु एकदोन गोष्टी खेरीजकरून आमचा शेतकरीवर्ग फार काटकसरी आहे असें बारकाईनें पाहणारास दिसून आल्यावांचून राहणार नाहीं. परंतु आमच्या शेतक-यांची व इतर गरीब रयतेची इतकी दैन्यावस्था झाली आहे कीं, त्यांना पुरेसें खावयाला मिळत नाही; मग संचय करण्याची गोष्ट त्यांना काय होय ? तरी पण आमच्या इकडेही पोस्टल बँकेची पद्धत निघाल्यापासून गरीब लोकांची पुष्कळ सोय झालेली आहे व त्यामुळे थोडी तरी मनुष्यांची संचयी प्रवृत्ति वाढलेली आहे असें दिसतें. परंतु सुधारलेल्या देशाच्या मानानें आपल्या देशांत द्रव्यसंचय किती थोड्या प्रमाणानें होत आहे हें खालील कोष्टकावरून दिसून येईल.

देशाचे लोकवस्ती ठेवी ठवणारांचा ठेव रुपयांत दर माणशी ठेव नाव संख्या रु.


फ्रांस ३९२६२२४५ १३२०६५६४ ३१३६६६६९०२ ८०


हिंदुस्तान २३२०७२८३२ २७६ १५१८१५००१ ५/८


 आतां कामाच्या विभक्तिकरणावरुन युरोपांत पेढ्यांचे निरनिराळे प्रकार झालेले आहेत. कांहीं फक्त ठेवी पेढ्या असतात. पोस्टल बँका या प्रकारामध्यें येतात. कांहीं फक्त व्याजबट्याचें काम करितात. कांहीं फक्त पैसे इकडून तिकडे पाठविण्याचें काम करितात. यांना हुंडीपेढ्या म्हणतात.