पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२७]

 विषद भाषाशैली व शास्त्रीय तत्वांचें सोदाहरण स्पष्टीकरण होय. मिल्लचीं अर्थशास्त्रविषयक मतें सरासरी जुन्या म्हणजे अभिमत पंथाचींच आहेत. परंतु त्याचा काळ हा संक्रमणावस्थेचा काळ होता व मिल्लचें मन नव्या नव्या कल्पनांचें ग्रहण करण्यास योग्य असें होतें, यामुळे त्यानें पुष्कळ बाबतीत नवीन मतें ग्रहण केलीं आहेत. तो सामाजिक पंथ याचा अभिमानी झाला होता व त्यांच्या कांहीं कल्पनांचा स्वीकार त्यानें आपल्या पुस्तकांत केला आहे. उदाहरणार्थ, पुढील पुस्तकांमध्यें ज्या 'मजुरीफंड' नांवाच्या मजुरीच्या उपपत्तीचा ऊहापोह करावयाचा आहे, त्यावर प्रथमतः मिल्लचा भरंवसा होता, परंतु पुढे ही उपपत्ति वस्तुस्थितीला धरून नाहीं असें त्याच्या ध्यानांत आल्यापासून त्यानें ती उपपत्ति सोडून दिली. परंतु मिल्लच्या या नवीन कल्पनग्रहणक्षमतेपासून त्याच्या ग्रंथांत नव्याजुन्या कल्पनांची खिचडी होऊन त्यामध्यें बरीच विसंगतता आली आहे; तरी पण मिल्लचें सामान्य धोरण रिकार्डोच्या व मालथसच्या मतांचा अनुवाद करण्याचच असल्यामुळे मिल्ल हा अभिमतपंथीच अर्थशास्त्रज्ञ होता असें ह्मणणें भाग आहे.
 यानंतरचे या पंथाचे अभिमानी ग्रंथकार केअर्नस्, फॉसेट, सिजविक् व निकॉलसन् हे होत. पहिल्या दोघांनीं बहुतेक ठिकाणीं मिल्लचाच अनुवाद केला आहे. दुस-या दोघांनीं मात्र ऐतिहासिक पद्धतीचा व अभिमत अर्थशास्त्राविरुद्ध असणा-या दुस-या लेखकांच्या ग्रंथांचा उपयोग करून या जुन्या अर्थशास्त्राचीं प्रमेयें थोड्याबहुत फेरबंदलानें सध्यासुद्धां वस्तुस्थितीशीं कशीं सुसंगत आहेत हें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
 रिकार्डो, मिल्ल व केअर्नस् या ग्रंथकारांचे फ्रान्समधील अनुयायी कझन व जे. बी. से यांनीही तार्किक पद्धतीचा सर्वस्वी अवलंब केला व या शास्त्राचीं प्रमेयें सर्व ठिकाणीं व सर्व काळीं सारखींच लागू असली पाहिजेत असें प्रतिपादन केलें. परंतु अर्थशास्त्रांतील तत्वें भूमितिशास्त्राच्या तत्वांप्रमाणं त्रिकालाबाधित नसल्यामुळे, अभिमत अर्थशाखांतील सिद्धांतांचा दुस-या देशांतील वस्तुस्थितीशीं विरोध दिसून येऊं लागला. उदाहरणार्थ, अभिमत अर्थशास्त्राची तत्वें जर्मनीसारख्या औद्योगिक व राजकीय बाबतींत मार्गे असलेल्या देशाला लागू पडेनात. यामुळेंच जर्मनीमध्यें ऐतिहासिक पंथाचा उदय झाला. या