पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/388

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३७६ ] लोकांच्या अंगवळणीं पडूं लागली. यायोगानें देशांत भांडवल झपाट्यानें वाढू लागलें; कारण जें भांडवल पूर्वी निरुपयोगी असे व ज्याचा उत्पादक धंद्यास उपयोग नसे, असें भांडवल उत्पादक धंद्याकडे जाऊं लागले. या सराफांच्या पेढ्या देशांतील भांडवल एकत्र करणा-या संस्था बनल्या व त्यामुळे देशांतील व्यापारास फारच उत्तेजन येऊन इंग्लंडची सर्व तऱ्हेनें भरभराट होऊं लागली. आतांपर्यंत समाजाच्या कोणत्या स्थितींत पेढीच्या व्यापाराची अवश्यकता उत्पन्न होते व युरोपमध्यें कोणकोणत्या देशांत कोणकोणत्या कारणांनीं प्रथमतः पेढ्या स्थापन झाल्या, याचें थोडक्यांत वर्णन केलें. तसेंच खुद्द इंग्लंडांत पहिल्या चार्लस राजाच्या विश्वासघाताच्या वर्तनापासून लोकांचा राजावरील विश्वास उडून लोक आपले पैसे व शिल्लक सोनार व सराफ या धंद्यांच्या लोकांजवळ ठेवू लागले व या धंद्यांचे लोक हळूहळू पेढीचा व्यापार करूं लागून मोठे पेढीवाले बनले, याचेंही दिग्दर्शन केलें. आतां इंग्लंडांतील फार मोठी जी बँक ऑफ इंग्लंड तिच्या स्थापनेची थोडी हकीकत देऊन पेढीच्या निरनिराळ्या प्रकारांकडे व पेढीच्या व्यापाराच्या अन्तःस्वरूपाकडे वळण्याचा विचार आहे. इंग्लंडचा तिसरा विल्यम राजा हा हॉलंडमधील रहिवाशी होता व त्या काळीं डच लोक व्यापारांत फार पुढें होते व त्यांस पेढीच्या व्यापाराचें महत्व व पेढ्यांचा व्यापारावर सुपरिणाम यांचें चांगलें ज्ञान होतें. अशा लोकांपैकीं विल्यम होता. शिवाय तो मोठा धूर्त मुत्सद्दी होता. त्यास फ्रान्स देशाशी लढाई करून फ्रान्सच्या चवदाव्या लुई राजाचा नकशा उतरावयाचा होता. यामुळे त्याचें सर्व आयुष्य लढायांत गेलें. या युरोपांतील लढायांकरितां त्यास कर्ज पाहिजे होतें. १६९४ साली त्यास १२ लक्ष पौंड कर्जाची गरज होती. हें कर्ज देणा-या लोकांस बँक ऑफ इंग्लंड म्हणून एक पेढी काढून कांहीं विशेष सवलती देण्याचें विल्यम राजानें कबूल केलें. सरकारास पाहिजें होतें तितकें कर्ज एक दोन आठवड्यांत मिळून या पेढीची स्थापना झाली. या पेढीच्या स्थापनेचा कायदा प्रसार करतांना पार्लमेंटांत बराच कडाक्याचा वाद झाला. कांहीं लोक या कल्पनेच्या विरुद्ध होते. त्यांच्या मतें या पेढीमुळे सरकार वाटेल तितके पैसे कर्ज काढ़ूं शकेल व मग तें पार्लमेंटास धाब्यावर बसवून जुलुमी व