पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/384

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३७२] काय किंवा कागदी चलनपद्धति काय दोन्हीही स्वाभाविक व अकृत्रिम तऱ्हेच्या पाहिजेत ह्मणजे देशाच्या व्यापाराच्या गरजेप्रमाणें पैसा आपोआप कमी जास्त होण्याची तजवीज त्या पद्धतीमध्यें पाहिजे. परंतु टांकसाळी खुल्या केल्याखेरीज व चलनी नोटा परिवर्तनीय असल्याखेरीज पैशाच्या पद्धतींत हा लवचीकपणा रहात नाहीं. दोन्ही नाण्यांच्या किंमती व संख्या फक्त सरकारच्या कायद्यावर अवलंबून राहिल्या ह्मणजे चलनपद्धति कृत्रिम होते व अशी कृत्रिम पद्धति देशाच्या व्यापारास अपायकारक होण्याची फारच धास्ती असते. ह्मणूनच अर्थशास्त्रीयदृष्ट्या धात्वात्मक चलनपद्धति काय किंवा कागदी चलनपद्धति काय दोन्हीही स्वाभाविक असल्या पाहिजेत असा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. या दृष्टीनेंच देशाच्या वाढत्या भरभराटीबरोबर व्यापारांत व्यावहारिक चलनपद्धति सुरू होते व या पद्धतीच्या प्रवर्तकसंस्था ह्मणजे पेढ्या होत. तेव्हां पुढल्या भागांत या संस्थांचा इतिहास व स्वरुप यांचा विचार करणें क्रमप्राप्त आहे व मग या संस्थांकडून व्यावहारिक कागदी चलन कसें प्रचारांत येतें हें पाहणें सुलभ होईल.

भाग बारावा.

पेढीची उत्पत्ति

समाज उत्क्रांतीच्या खालच्या पायरीवर असतो त्या वेळीं पेढीच्या व्यापाराची उत्पत्ति होणे शक्य नसतें. कारण अशा रानटी स्थितीतं नाणें व पैसा यांचा मुळीं व्यवहारांत उपयोगच सुरू झालेला नसतो. समाज मृगयावृत्तींत असतांना किंवा वडा-याप्रमाणें जनावरांचे कळप घेऊन रानोमाळ हिंडणाच्या गोपालकृतींत असतांना, किंवा कृषीवृत्तींत असतांना सुद्धा पेढ्या उत्पन्न होत नाहीत; परंतु याच्या पुढल्या स्थितीत समाज आला म्हणजे पैशान नेहमी व्यवहार सुरू होत असतो, कलाकौशल्याचे पदार्थ उत्पन्न होऊ लागतात व निरानराळ्या देशांचा व्यापार सुरू होतो. या