पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/382

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३७०] आहे त्यापेक्षां जास्त रकमेच्या नोटा रोख रकमेखेरीज काढण्याची जरुरी वाटल्यास पेढ्यांना तसें करण्याची सवलत ठेविली आहे. मात्र त्यांनीं या सवलतीबद्दल अशा रकमेवर दरसाल दरशेंकडा ५ टक्के कर दिला पाहिजे. तसेंच चलनी नोटांच्या पूर्ण परिवर्तनाकरितां आणखी अशीही एक शर्त आहे कीं, कोणत्याही पेढीच्या चलनी नोटांच्या एकंदर रकमेच्या निदान एकतृतीयांशापेक्षां कमी सोनें-नाणें पेढीच्या तिजोरीत होतां कामा नये. येथपर्यंत कायदेशीर परिवर्तनीय चलनी नोटांच्या स्वरूपाचा व त्यांच्या परिवर्तनाच्या तत्वांचा विचार झाला. आतां कायदेशीर कागदी चलनाच्या एकच प्रकाराचा विचार करण्याचें राहिलें. तो प्रकार अपरिवर्तनीय कागदी चलनाचा होय. केव्हां केव्हां असें कागदी चलन हें परिवर्तनीय चलनी नोटांपासून उद्भूत होतें. देशांतील चलनी नोटा परिवर्तनीय म्हणून काढलेल्या असतात. त्यांच्या पूर्ण परिवर्तनास लागणारें सोनें-नाणें देशांत शिल्लक असतें. परंतु देशाला लढाई करावी लागल्यामुळें किंवा एकाएकीं परकी देशांत सोनें-नाणें फार पाठवावें लागल्यामुळे या शिलकेचा त्या कामाला कर्ज म्हणून उपयोग केला जातो. परंतु मग चलनी नोटांचें परिवर्तन बंद पडतें व अशा प्रसंगीं सरकार किंवा पेढी यांनीं नोटाबद्दल रोख पैसे दिले पाहिजेत अशी कायद्यांतील शर्त तहकूब करावी लागते. इंग्लंडचें फ्रान्सबरोबर भयंकर युद्ध चाललें असतांना १७९७ मध्यें इंग्लंडमध्यें असा तहकुबीचा कायदा ' करावा लागला होता. व हा तहकुबीचा कायदा १८१९ पर्यंत चालला होता. अर्थात् या सर्व काळांत इंग्लंडांतील चलनी नोटा या अपरिवर्तनीय होत्या. म्हणजे नोटांबद्दल रोख पैसे मिळत नसत. फ्रान्समध्यें जॉन लॉच्या शिफारशीवरून प्रथमतः परिवर्तनीय चलनी नोटा काढल्या होत्या. परंतु पुढें त्या अपरिवर्तनीय केल्या गेल्या. फ्रान्सच्या राज्यक्रांतीनंतरही एकदां असायनेटस् म्हणून अशा अपरिवर्तनीय नोटा काढण्यांत आल्या होत्या; अमेकेिंतील निरनिराळ्या संस्थानांनीं अंशा प्रकारचे पुष्कळ प्रयोग करून पाहिले होते. अमेरिकेच्या अन्तर्युद्धांतही ग्रीनबँक्स नांवाच्या चलनी नोटा काढण्यांत आलेल्या होत्या. याप्रमाणे अडचणीच्या प्रसंगीं निरनिराळ्या दॆशांनीं अपरिवर्तनीय चलनी नोटा काढल्याचे दाखले आहेत खरे, तरी पण नेहमीच्या व्यवहारांत अशी