पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/380

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३६८ ] वाढवावयाचा अशीही एक शर्त कायद्यांत होती. याप्रमाणें बँक ऑफ इंग्लंडला सध्या १ कोटी ८४ लक्ष पौंडांपर्यंत आपल्या निव्वळ तारणावर नोटा काढण्याचा अधिकार आलेला आहे. इतर बँकांना ठरलेल्या मर्यादेबाहेर केव्हांही अधिक नोटा काढण्याचा आधिकार नव्हता. मात्र १८४५च्या कायद्यानें अशी सवलत स्कॉटलंडातील पेढ्यांना दिलेली होती. म्हणजे बँक आफ इंग्लंडप्रमाणें स्कॉटलंडातील पेढ्यांना ठरलेल्या मर्यादेच्या बाहेर प्रत्यक्ष सोनें-नाण्याच्या रकमेइतक्या नोटा काढण्याचा आधिकार आहे. बँक आफ इंग्लंडच्या किती नोटा प्रचारांत आहेत व त्याबद्दल किती सोनें-नाणें बँक आपल्या तिजोरींत ठेवते याची कल्पना १९०९ च्या आंकड्यावरून होईल. १९०९ सालीं बँक ऑफ इंग्लंडनें ५ कोटी पौंडांच्या नोटा काढल्या होत्या व तिच्या तिजोरींत सुमारें ३ कोटी १८ लक्ष इतकें प्रत्यक्ष सोनें होतें.

  या कायद्याच्या धोरणाबद्दल अजूनही फार मतभेद आहे. चलनी नोटांचें पूर्ण परिवर्तन राखणें हा या कायद्याचा उद्देश आहे. परंतु याविरुद्ध असणा-या लोकांचें म्हणणें असें आहे कीं, हा कायदा त्या कामी निरुपयोगी आहे. अर्थात् बँक आपण होऊनच अवश्य तितकें सोनें-नाणें आपल्या तिजोरींत ठेवील व नोटांचा अतिरेक होणें शक्य नाहीं. कारण बँकेनें जर व्यापाराच्या अवश्यकतेपेक्षां जास्त नोटा काढल्या तर अशा नोटा व्यापारांत फार वेळ टिकणारच नाहीत, तर त्या रोख पैशाकरितां बँकेकड़े परत येतील व बँकेने  जर रोख पैसे दिले नाहीत ह्मणजे नोटा जर परिवर्तनीय राहिल्या नाहींत तर बँकेचें दिवाळे निघेल. परंतु व्यापाराच्या आणीबाणीच्या प्रसंगी या कायद्यानें जास्त अडचण मात्र होईल व आणीबाणीतून पार पडणे जवळ जवळ अशक्य होईल. म्हणजे ज्या वेळीं चलनी नोटांची खरोखरी अवश्यकता असते, त्या वेळी त्या मिळणार नाहीत. उदाहरणार्थ, लढाईकरितां वगैरे सरकारला रोख पैशाची जरूरी लागली व हे पैसे बँकेने सरकारला कर्जाऊ दिले तर देशांतील सोने-नाणे कमी होईल व अशावेळीं देशांतील व्यापाराचा घोटाळा होऊं नये ह्मणून चलनी नोटांची गरज ज़ास्त लागेल; परंतु याच वेळीं १८४४ च्या कायद्याच्या कडक निर्बंधनानें बँकेला नोटा देणें अशक्य होईल व ह्मणून हा कायदा नेहमीं निरुपयोगी तर प्रसंगीं अडथळा करणारा आहे व तो कायदा