पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३५३ ]

धातू टांकसाळींत स्वीकारल्या जात नाहींत. तर एकचलनपद्धतीप्रमाणें एकच धातु-व ती सोनें ही-टांकसाळींत स्वीकारली जाते. हिंदुस्थानची हल्ली अशीच चलनपद्धति आहे. येथें पौंड व रुपये हीं कायदेशीर फेडीचीं सारख्या दर्जाचींच चलनें आहेत. म्हणून हिंदुस्थानची चलनपद्धति सध्या द्विचलनपद्धतीच्या जातीची आहे. १५ ते १ हें प्रमाणही कायद्यानेंच ठरविलें आहे. टांकसाळींत सोनें घेऊन रुपये पाडून मिळतात. मात्र अजून येथल्या टांकसाळींत पैोंड पाडू लागले नाहींत. ते पाडण्याची तजवीज झाली म्हणजे मग लॅटिन युनियनच्या पद्धतीशीं हिंदुस्थानची पद्धति तंतोतंत जुळेल. व हल्लींची हिंदुस्थानांत चालू असलेली किंमतीची घडामोड व विलक्षण क्रांति स्थिर करण्यास सरकारनें या मार्गाचें अवलंबन केलें पाहिजे असें पुष्कळ अर्थशास्त्रज्ञांचें मत आहे. म्हणजे हिंदुस्थानच्या चलनपद्धतीची संक्रमणावस्था जाऊन त्याला शास्त्रीयदृष्ट्या एक ठाम असें स्वरूप येईल. तेव्हां पौंड व रुपया हीं हिंदुस्थानांतील सध्या प्रमुख फेडीचीं चलनें होत व या मुख्य चलनाखेरीज उपपैसा म्हणून किरकोळ व्यवहाराकारतां हिंदुस्थान सरकार लहान लहान नाणीं पाडतें. त्यांची विशेष माहिती देण्याचें प्रयोजन नाहीं. १९०७ मध्यें हिंदुस्थान सरकारनें उपपैशांत आणखी एक भर घातली व ती चांगल्या स्वरूपाची आहे यांत शंका नाहीं. निकल धातूचें एक आणा किंमतीचें एक नवें नाणें उपपैसा म्हणून सुरू केलेलें आहे. जरी कायद्याच्या दृष्टीनें हिंदुस्थानांतील हल्लींचा रुपया हें मुख्य चलनांपैकीं आहे तरी त्याला कृत्रिम किंमत दिली असल्यामुळे रुपयाची नाणें या नात्यानें किंमत त्यांतील धातुगत किंमतीपेक्षां जास्त आहे. म्हणजे रुपयाला हल्लीं सांकेतिक किंमत आहे व म्हणून रुपया हा या दृष्टीनें उपपैशाच्या जातीचा आहे. मात्र त्याच्या फेडीच्या चलनाच्या कार्यभागाला उपपैशाप्रमाणें मर्यादा नाहीं इतकेंच. कायदेशीर फेडीचें चलन, नाणकगत व धातुगत किंमतीचें ऐक्य व टांकसाळींतील मुक्तद्वार हे तीन गुण देशांतील प्रमुख पैशांत पाहिजेत व या दृष्टीनें हलीं हिंदुस्थानचें पौंड हेंच खरें नाणें आहे. कारण पौंडांत हे दोन्ही गुण आहेत असें मागें दाखविलें आहे.

येथें धात्वात्मक पैशाच्या निरनिराळ्या पद्धतींचा विचार व वर्णन पुरें झालें. परंतु मागें सांगितलेंच आहे कीं, देशाच्या आधिभौतिक प्रगती

  २३