पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३३७] घेऊन विवेचन केलें असतां हा मुद्दा स्पष्ट होईल. उत्तर द्यावयाचा आक्षप असा आहे कीं, अन्तर्राष्ट्रीय द्विचलनाच्या स्वीकारानंतर या वीस वर्षांत सोन्याच्या मानानें चांदीचा भाव उतरलाच असता व त्यायोगें सोनें प्रचारांतून नाहींसें झालें असतें. आतां कल्पना करा कीं, नाणें व धातु मिळून पैशाकरितां ५० कोटी पौंड सोनें प्रचारांत आहे व चांदीही ५० कोटी रुपये आहे. (हा आंकडा नेहमींच्या अंदाजापेक्षां कमी धरला आहे. ) आणखी अशीही कल्पना करा कीं, सोन्याची सरासरीनें वार्षिक पैदास २ कोटींची आहे व चांदीची पैदास ६ कोटींची आहे. (येथेंही सोन्याची पैदास थोडी कमी धरली आहे व चांदीची थोडी जास्ती धरली आहे.) तसेंच या जगांतील सोन्यारुप्याच्या पैदासीपैकीं १ कोटी ५० लक्ष सोनें कलाकौशल्याच्या कामांस व पूर्वेकडील देशांत पाठविण्यास लागतें. ह्मणजे ५० लक्ष पौंड सोनें पैशाकरितां राहिलें; आणि ६ कोटी चांदीपैकीं २ कोटी चांदी कलाकौशल्याच्या कामास व बाहेर देशी पाठविण्यास लागते. तेव्हां पैशाच्या कामाकरितां चार कोटी राहिली असें समजा. या गोष्टी गृहीत धरल्या ह्मणजे ४ कोटी पौंड चांदी व ५० लक्ष पौंड सोने हे नाण्याकरितां राहिलें. (ही कल्पना सोन्याच्या भावाची चढ व चांदीच्या भावाचा उतार होण्यास अनुकूल अशी आहे.) मागणी व पुरवठा यांची वर गृहीत धरलेली स्थिति ध्यानांत ठेवून आतां अशी कल्पना करा कीं, बाजारभाव कायदेशीर साडेपंधरांस एक याऐवजी वीसांस एक या प्रमाणांत झाला. म्हणजे सोन्याच्या एका औसाला साडेपंधरा औसांऐवजीं वीस औस चांदी मिळू लागली. कायद्याप्रमाणें सोन्याच्या नाण्यास रुप्याची नाणीं जितकीं मिळतात त्यापेक्षां सोन्याला धातू या नात्यानें जास्त चांदी मिळेल. ह्मणून कोणीही मनुष्य सोनें टांकसाळींत नेणार नाहीं, उलट सोन्याचीं नाणीं वितळवून सोनें बाजारात विकलें जाईल, व चांदीचीं नाणीं पाडलीं जातील. जोंपर्यंत बाजारभाव व कायदेशीर भाव यांत अंतर आहे तोंपर्यंत सोन्याची नवी नाणीं न पडतां आहेत ती वितळण्याचा क्रम चालेल. कायदेशीर भाव व बाजारभाव यांतील फरकाचा आतां काय परिणाम होतो तें पहा. हें सर्व सोनें रुप्याच्या नाण्याचे बदला विकलें गेलें पाहिजे; व आतां प्रक्ष असा उद्भवतो की ही सर्व चांदी कोठून यावयाची ! चांदीचे नाण्याकरितां उपयोगी पडणारीं