पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३३५]

यांच्या तो तेव्हांच ध्यानांत येईल. व पेढीच्या पूर्ण वाढीच्या पद्धतींत ग्रेशॅमच्या सिद्धांताचें कार्य कमी होण्याऐवजीं जोरानें व जलद होऊं लागेल. दोन धातूंच्या नाण्यांमध्यें किंमतीचा अगदीं थोडा फरक असला तरी महाग धातूचीं नाणीं प्रचारांतून तेव्हांच नाहींशीं होतील. उदाहरणार्थ, न्यूटननें सोन्या-रुप्याचा विनिमयभाव ठरवितांना सोन्याचा किंचित् उत्कर्ष केल्यामुळे इंग्लंडांत रुप्याचीं नाणीं प्रायःप्रचारांतून नाहीशी होऊन बहुतेक चलन सोन्याचें बनलें. याच्या उलट उदाहरण राजक्रांतींतील कायदेकारांनीं रुप्याचा किंचित उत्कर्ष केल्यामुळें फ्रान्सचें चलन बहुतेक रुप्याचें बनलें.
  द्विचलनपद्धतींतील महाग झालेली धातु बहुधा देशाबाहेर जाऊन कमी होते. समजा कीं, द्विचलनी देशामध्यें रुपें अपकृष्ट झालें आहे. म्हणजे त्या रुप्याची परकी देशांतील सोन्यांतील किंमत देशांतील टांकसाळींतील किंमतीपेक्षां कमी झाली आहे. आतां सोनें निर्गत करणा-या माणसाला परदेशांतील रुपें स्वस्त मिळेल व त्याच रुप्याची देशांतील टांकसाळींत किंमत जास्त येईल. म्हणजे या कृत्यांत त्याला फायदा पडेल व असा फायदा पडत आहे तोंपर्यंत देशांतून सोनें बाहेर जाईल व रुपें देशांत येत राहील.
  तेव्हां ज्या अर्थी कायदेशीर भावांत व बाजारभावांत थोडा जरी फरक पडला असें धरलें तरी द्विचलन-पद्धति डळमळते त्या अर्थी प्रत्यक्ष व्यवहारांत असा भावांत फरक फडण्याचा किती संभव आहे हें पाहिलें पाहिजे. एका बाजूचें असें म्हणणें आहे कीं, दोन धातूंच्या उत्पत्तीत स्वाभाविक फरक पडण्यासारखा आहे व त्यामुळें दोन धातूंच्या पुरवठ्यांत फरक पडलाच पाहिजे; त्याचप्रमाणें निरनिराळ्या कारणांनीं या धातूंच्या मागणींतही फरक पडणें स्वाभाविक आहे. तेव्हां दोन धातूंच्या बाजारभावांत फरक पडण्याचा संभव दृढतर होती व असें मानलें कीं द्विचलनपद्धति डळमळते व या गोष्टीच्या समर्थनार्थ द्विचलनपद्धतीचे विरोधक असें दाखवितात कीं, द्विचलन-पद्धतींत सरकारला वारंवार भाव बदलावा लागतो. दुस-या बाजूनें असें सांगण्यांत येतें कीं, द्विचलनी देशामध्यें दोन्ही धातूंचा एकंदर समूह पुष्कळ असला म्हणजे धातूच्या समतावह क्रियनें बाजारभाव कायदेशीर भावाबाहेर जाऊ शकत नाहीं.याच्या