पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२]

 ईश्वरनिर्मित जगांत सतत राहणार असें ठरत असल्यानें देवावर अन्यायीपणाचा दोष येतो. परंतु याचें पुस्तक श्रीमंत लोकांना मात्र आवडलें. कारण, गरीब लोकांची दुःस्थिति त्यांनीं आपल्या अविचारानें आपणावर ओढून आणलेली आहे, असा त्याच्या प्रतिपादनाचा एकंदर रोख होता.

 या निबंधाच्या दुस-या आवृत्तींत मालथसनें पुष्कळच फरक केला. खरोखरी त्याचा ग्रंथ नवीनच झाल्याप्रमाणें झाला. पहिल्या आवृत्तीइतकी एककल्ली विचारसरणी त्यामध्यें नव्हती. आपल्या ह्मणण्यास त्यानें ऐतिहासिक पुरावा पुष्कळ जोडला. विशेषतः लोकसंख्या मर्यादित करणारें आणखी एक कारण प्रमुखत्वेंकरून त्यानें पुढें केलें. तें कारण म्हणजे दूरदर्शीपणा हें होय. जर मनुष्यांनीं लग्नाच्या बाबतींत दूरदर्शीपणा दाखविला व आपल्या बायकोचें व भावी मुलांचें चांगल्या रीतीनें संगोपन करतां येईल अशी सांपत्तिक स्थिति प्राप्त होईपर्यंत लग्नाचा विचार पुढें ढकलला तर लोकसंख्या कमी करणाऱ्या साक्षात् कारणांचा जोर कमी होईल. याप्रमाणें मालथसनें आपल्या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तींत समाजसुधारणेची शक्यता कांहीं अंशानें कबुल केली; परंतु ही सुधारणा घडून येण्यास मनुष्यांमध्यें विवाहसंबंधीं दूरदर्शीपणा व आपल्या मुलांबाळांचें संगोपन आपणच केलें पाहिजे अशी स्वावलंबी भावना उत्पन्न झाली पाहिजे असें प्रतिपादन केलें.

 याच्या पुढला अर्थशास्त्रकार म्हणजे रिकार्डो. यानें भाड्याची एक नवीन मीमांसा काढली. तसेंच राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापाराच्या तत्वाचा ऊहापोह केला. रिकाडेनें अर्थशास्त्र हें एक भूमितीसारखें तार्किक शास्त्र आहे असें प्रतिपादन केलें. या शास्त्राला अवलोकनाची गरज नाहीं. ज्याप्रमाणें संख्या व परिमाण यासंबंधींच्या कांहीं स्वयंसिद्ध तत्वांपासून गणितशास्त्र आपलीं सर्व तत्वें काढितें, त्याप्रमाणें मानवी स्वभावाच्या कांहीं स्वयंसिद्ध तत्वांपासून तार्किक पद्धतीनें सर्व प्रमेयें व सिद्धान्त अर्थशास्त्र काढितें. या शास्त्राचीं विधानें गणिताप्रमाणेंच सर्व काळीं व सर्व ठिकाणी व समाजाच्या कोणत्याही स्थितींत सारखींच लागू पडतात. अर्थशास्त्राला हें स्वरूप रिकॉर्डोनें दिलें ही गोष्ट फार अनिष्ट झाली कारण या तार्किक पद्धतीनें काढलेल्या या शास्त्रांतील पुष्कळ सिद्धांतांचा सत्याशीं व वस्तुस्थितीशीं विरोध येऊं लागला व म्हणूनच या शास्त्राच्या विफलतेबद्दल व खोटेपणाबद्दल ओरड होऊं लागली.