पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/333

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ह्मणून तीं द्रव्यें मागें पडलीं. औद्योगिक बाबतींत पुढारलेल्या देशांत सोन्यारुप्याचीं नाणीं सुद्धां नेण्याआणण्यास गैरसोयीचीं वाटूं लागतात व म्हणूनच कागदी-चलनें व व्यापाऱ्याची साक-पत्रें यांचा पैशासारखा उपयोग होऊ लागतो. कारण एका लहान कागदाची किंमत हजारों रुपये होऊं शकते व हल्लीच्या काळीं एखादा मनुष्य एक लाख रुपये एका खिशांत ठेवून प्रवास करूं शकेल. मात्र हे रुपये कागदी-चलनाचे पाहिजेत ह्मणजे झालें.

   पैशाच्या द्रव्यांतील तिसरा गुण अविनाश्यता हा होय. पैसा हा टिकाऊ पाहिजे. कारण मनुष्य तो आपल्याजवळ पुष्कळ दिवस ठेवीत असतो. शिवाय आपली शिल्लक ठेवण्याचेही तोच साधन असतो. तसेंच कालांतरानें पुऱ्या होणाऱ्या व्यवहाराचें परिंमाणही तोच असतो. तेव्हां पैशाचें द्रव्य नश्वर वर्गापैकीं असतां कामा नये. या दोषांमुळेंच पूर्वकाळच्या समाजांतील पुष्कळ पैशाचीं द्रव्यें मार्गे पडली. या बाबतींत धातूधातूमध्यें सुद्धां फरक आहे. उदाहरणार्थ, लोखंड ही धातुंपैशाच्या द्रव्याला योग्य नाहीं. कारण ती गंजून खराब होते. 
   पैशाच्या द्रव्याचा चवथा गुण सजातीयता होय. ज्याचा पैसा करावयाचा तें द्रव्य सर्व सजातीय असलें पाहिजे. अर्थात् त्या द्रव्याचा कोणताही भाग घेतला तरी तो अगदीं सारखा असावा म्हणजे सारख्या वजनाच्या द्रव्याची किंमत नेहमीं एकच असावी. गुरेंढोरे, गुलाम, धान्य वगैरे पैशाच्या प्रकारांत या गुणाचा अभाव असतो. म्हणून हे पैशाचे प्रकार मार्गे पडतात.
   पैशाच्या द्रव्यांतील पांचवा गुण सुविभाज्यता हा होय. पैशाच्या द्रव्याचे हवे तितके लहान लहान तुकडे व विभाग करतां यावे म्हणजे पदार्थाचें मोल ठरविण्यास सुलभ होतें व पैशाचीं निरनिराळ्या वजनाचीं व आकाराचीं कमी जास्त मोलाचीं नाणीं करतां येतात व त्यामुळे पदार्थाची अदलाबदल होण्यास फार सोयीचें हातें.  
   पैशाच्या द्रव्यांतील सहावा गुण मोलाची स्थिरता होय. पैसा हा इतर सर्व पदार्थांचें मोल मोजण्याचें परिमाण अगर कसोटी होय, त्या अर्थी त्याची किंमत स्थिर पाहिजे. ज्याप्रमाणें लांबी मोजण्याचा फूट हा नेहमीं एकच असला पाहिजे त्याप्रमाणें ज्यानें किंमती मोजावयाचा तो पैसाही होतां होईल तों स्थिर मोलाचा पाहिजे हें उघड आहे.