पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३११ ] अवलंबून असते; व श्रमाबद्दल मोबदला म्हणजे मजुरी होय. तेव्हां पदार्थांची मूळकिंमत ही मुख्यत: मजुरीवर अवलंबून आहे. कारण उत्पादनाचा मुख्य खर्च म्हणजे मजुरी-खर्च होय. वरील प्रकारचें विवेचन रिकार्डोनें प्रथमतः केलें. त्याच्या मताप्रमाणें पदार्थाच्या मूळकिंमती या मजुरी-खर्चावर अवलंबून आहेत. देशांतील मजुरांची मजुरी कमी झाली तर मूळकिंमत कमी होईल. देशांतील मजुरांची मजुरी वाढली तर मूळकिंमत वाढेल. रिकार्डोच्या या विवेचनापासून सामाजिक पंथ उद्भवला व त्यानें सर्व संपत्ति मजूरवर्गाची आहे; भांडवलवाले श्रम न करतां मजुरांच्या श्रमाचा फायदा मात्र लाटतात असें मत प्रतिपादन केलें. परंतु संपत्तीच्या उत्पादनाची ही कल्पना संकुचित आहे व ती समाजाच्या अत्यंत बाल्यावस्थेवरून काढलेली असल्यामुळें अर्वाचीन कालच्या संपत्तीच्या उत्पादनाला बरोबर लागू पडत नाहीं. अर्वाचीन काळीं संपत्तीच्या चारी कारणांचा कार्यभाग महत्वाचा आहे. विशेषतः भांडवलवाला व कारखानदार यांचा संपत्तीच्या उत्पादनांतील कार्यभाग पहिल्या दोहोंपेक्षां जास्त महत्त्वाचा आहे व ह्मणून संपत्तीच्या उत्पादनाच्या खर्चांत या चारी कारणांचा विचार झाला पाहिजे. अर्थात् संपत्तीच्या उत्पादनखर्चाचे चार घटकावयव होतात. कोणतीही संपत्ति उत्पादन करावयाची असल्यास प्रथमतः कच्चा माल लागतो व अर्वाचीन काळीं असा माल बाजारांत विकत घ्यावा लागतो तेव्हां कच्च्या मालाचा खर्च हा उत्पादनाच्या खर्चातला पहिला घटकावयव होय. दुसरा घटकावयव मजुरांस द्याव्या लागणा-या मजुरीचा होय; तिसरा घटकावयव भांडवलाच्या व्याजाचा होय व चवथा कारखानदारांच्या नफ्याचा होय. तेव्हां कोणत्याही पदार्थांच्या उत्पादनांच्या खर्चांत हें चारी घटकावयव असले पाहिजेत हें उघड आहे. कारण या चारी कारणांचें एकीकरण झालें नाहीं तर संपत्ति उत्पन्न होणार नाहीं व प्रत्येक कारणाला मोबदला मिळाल्याखेरीज त्यांचें एकीकरण होणार नाहीं. देशांतील एकंदर संपत्तीचे चार भाग होतात असें तिस-या पुस्तकांत दाखविलें. कारण संपत्तीचीं चारच कारणें आहेत व त्या कारणांइतकेच संपत्तीचे वांटे झाले पाहिजेत हें उघड आहे. तीच गोष्ट प्रत्येक वस्तूलाही लागू आहे. ह्मणजे त्या वस्तूंच्या मूळकिंमतीतही हे चारी भाग असले पाहिजेत. आतां प्रत्येक देशांत एक