पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३०५]

वाढ म्हणजे ही त्याच किंमतीला विकावयास काढलेल्या मालाच्या परिमाणांतील वाढ होय. यासंबंधींचे नियम खालीलप्रमाणें सांगतां येतील.

"जसजशी मालाची मागणी वाढते (पुरवठा तितकाच आहे असें धरून) तसतशी मालाची किंमत वाढते; उलटपक्षीं जसजशी मालाची मागणी कमी होते तसतशी मालाची किंमत उतरते.” “जसजसा मालाचा पुरवठा वाढतो (मागणी तितकीच आहे असें धरून) तसतशी किंमत कमी होते; उलटपक्षीं जसजसा पुरवठा कमी होतो तसतशी मालाची किंमत वाढते."

किंमतीच्या वाढीचीं कारणें जर एकसमयावच्छेदेंकरून वाढली तर किंमतीची वाढ फारच झपाट्यानें व दुहेरी होईल हें उघड आहे. अर्थात मालाची मागणी वाढत असतांना जर मालाचा पुरवठा कमी झाला तर मालाच्या किंमती दुप्पट वाढतील. एक मागणी वाढली म्हणून किंमत वाढेल .व दुसरें पुरवठा कमी झाला म्हणून किंमत वाढेल; अशा तऱ्हेनें किंमतींत दुहेरी वाढ होईल.

आतां मागणीच्या वाढीचीं कारणें अनेक असणार व त्याचा प्रत्यक्ष संबंध मनुष्याच्या राहणीशीं व त्याच्या वासनाच्या वाढीशीं आहे. शिक्षणानें वासनावाढ झाली असेल व म्हणून खर्च करण्याची प्रवृत्ति देशामध्ये वाढत असेल. एखाद्या वर्गाचें उत्पन्न वाढलें असेल व त्यामुळें खर्च करण्याची प्रवृत्ति वाढली असेल; किंवा देशामधील लोकांमध्ये नवीन फ्याशन शिरली असेल किंवा पूर्वीच्या चालीरीति बदलून नव्या येत असतील. किंवा उलटपक्षी लोकांचे उत्पन्न कमी झालें असेल व त्यामुळें मागणी कमी होत असेल. जो देश शेतकीवर सर्वस्वी अवलंबून आहे त्या देशामध्यें या कारणांनी मागणीमध्यें चलबिचल फार होते व त्यांचे उत्कृष्ठ उदाहरण हिंदुस्तानचेंच आहे. हिंदुस्तानांत बहुजनसमाजाचें उत्पन्न शेतापासून येतें. यामुळें या सर्व वर्गाची मागणी या उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणून पावसानें दगा दिला कि शेतकऱ्यांना पुरेसे अन्न मिळावयाचीच पंचाईत होते. तेव्हां कापडचोपडादि आयुष्याच्या सोई ते काय घेणार? यामुळें कापडाच्या मागणीत एकदम कमीपणा होतो व मालाच्या किंमती फार उतरुं नयेत म्हणून कारखानदार पुरवठा कमी करूं लागतात; म्हणजे आपले कारखाने कांहीं काळपर्यंत अजीबाद बंद करतात किंवा काम कमी तास करूं लागतात.